
थेट WhatsApp वर मिळवा
महामार्गावरील अस्वच्छ शौचालयाचा फोटो ‘राजमार्गयात्रा’ ॲपवर अपलोड करून तक्रार करणाऱ्या प्रवाशांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून १,००० रुपयांचे फास्टॅग रिचार्ज दिले जात आहे.
स्थैर्य, सातारा, दि. ०६ सप्टेंबर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) महामार्गांवरील स्वच्छतागृहांची स्वच्छता सुधारण्यासाठी ‘क्लीन टॉयलेट पिक्चर चॅलेंज’ हा विशेष उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत महामार्गावरील अस्वच्छ शौचालयाची माहिती फोटोसह देणाऱ्या प्रवाशाला १,००० रुपयांचे FASTag रिचार्ज देण्यात येत असून या योजनेची मुदत ३० जून २०२७ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
१,००० रुपयांचे मोफत रिचार्ज कसे मिळवाल?
महामार्गावर प्रवास करताना एखादे शौचालय अस्वच्छ आढळल्यास प्रवाशाला त्याचा स्पष्ट आणि जिओ-टॅग केलेला वेळ दर्शवणारा फोटो ‘राजमार्गयात्रा’ मोबाईल ॲपवर अपलोड करावा लागेल. त्यासोबत नाव, ठिकाण, मोबाईल क्रमांक आणि वाहनाचा नोंदणी क्रमांक देणे आवश्यक आहे. तक्रार योग्य ठरल्यास संबंधित वाहनाच्या फास्टॅग खात्यात १,००० रुपयांचे रिचार्ज केले जाते.
योजनेच्या अटी आणि आतापर्यंतचा लाभ
या योजनेत एका वाहनाला संपूर्ण कालावधीत फक्त एकदाच लाभ मिळतो. एकाच शौचालयाबाबत एकापेक्षा जास्त तक्रारी आल्यास पहिल्या वैध तक्रारदाराला लाभ दिला जातो. ही योजना फक्त एनएचएआयच्या अखत्यारीतील शौचालयांसाठीच लागू आहे. २०२६ मध्ये आतापर्यंत ४२९ प्रवाशांना या उपक्रमाचा लाभ मिळाला असून प्रवाशांना स्वच्छ सुविधा मिळाव्यात हा यामागचा मुख्य उद्देश आहे.





