स्थैर्य, फलटण : अनेक गोष्टींमध्ये शालेय, क्रीडा, स्पर्धा परीक्षा तसेच कोणत्याही प्रकारचे सामर्थ्य, कौशल्य या सर्वांमध्ये पश्चिम महाराष्ट्र हा अग्रेसर मानला जातो. त्याच्यापाठोपाठ पश्चिम महाराष्ट्रातच असणार्या सातारा जिल्ह्यातील फलटण तालुका हा देखील खूप नामांकित आहे. तसेच या सर्व गोष्टीं व्यतिरिक्त निसर्गाला देखील फलटण हे खुप आपुलकीचे वाटू लागले आहे की काय? असे कुतूहल मानवजातीला वाटू लागले. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे वन्यजीव संशोधकांना नुकताच फलटण तालुक्यामधून एका नवीन विंचवाच्या जातीचा शोध लागला आहे. आतापर्यंत भारतामध्ये या कुळातील चारच जातींची नोंद घेण्यात आली होती. वन्यजीव अभ्यासक तसेच संशोधक प्रमुख म्हणून वाइल्ड लाइफ प्रोडक्शन अँड रीसर्च सोसायटीमध्ये कार्यरत असणारे डॉक्टर अमित सय्यद यांनी सातारा जिल्ह्यामध्ये असणारी जैव विविधता अभ्यासण्यासाठी 2008 पासून सुरुवात केली होती. या अभ्यासाअंती 2016 साली सातारा जिल्ह्यातून एकूण 677 प्राण्यांची नोंद करण्यात आली होती. या अभ्यासासाठी सय्यद यांना तब्बल नऊ वर्षे अथक परिश्रम घ्यावे लागले आहेत. अभ्यासामध्ये फुलपाखरे, कोळी, विंचू, साप, पाली, सरडे, मासे, पक्षी तसेच विविध जातीचे सस्तन प्राणी यांचा समावेश केला होता.
या अभ्यासादरम्यान वन्य जीवांच्यावर संशोधन करताना त्यांना फलटण तालुक्यामध्ये विंचवाची निओस्कॉर्पिओपस फलटणनेसिस ही जात नवीन असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी व वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन अँड रिसर्च सोसायटीच्या सदस्यांनी फलटण तालुक्यामध्ये फील्ड वर्क चे कार्य सुरू केले. या विंचवाच्या कुळामधील फक्त चार जाती भारतामध्ये आढळून येत होत्या. फलटण तालुक्यामध्ये या नवीन विंचवाच्या प्रजातीचा शोध लागल्यामुळे या जातीमध्ये भर पडली आहे. त्याचे निओस्कॉर्पिओपस फलटणनेसिस हे नाव फलटण गावावरूनच ठेवण्यात आले आहे. या विंचवाच्या जातीची विशेषता म्हणजे हा विंचू फलटण सोडून भारतात इतरत्र कोणत्याही भागात आढळून येत नाही. फलटणमध्ये हि फक्त डोंगर कपारीतून आढळून येतो. फलटण भागातून पहिल्यांदाच नवीन प्रजातीचा शोध लागल्यामुळे शास्त्रीयदृष्ट्या फलटण भागाचे महत्त्व अत्याधिक वाढले आहे. या नवीन विंचवाच्या शोधामुळे जैवविविधता या दृष्टिकोनातून प्रशासनानेही याचे जतन करण्यास महत्त्व दिले पाहिजे. नवीन जातीच्या संशोधनाचा शोधनिबंध इछकड या आंतरराष्ट्रीय जरनल मध्ये प्रसिद्ध झाला आहे. यासाठी वन्यजीव संशोधक डॉक्टर अमित सय्यद व त्यांच्या टीमने कौतुकास्पद कार्य केले आहे. आणि फलटण व फलटण तालुक्याचे नाव उंचावले आहे. या निमित्ताने आता फलटण हे निसर्गाशी देखील अतिशय निगडीत व एकरूप असल्याचे सिद्ध करून दाखविले आहे.