नीरा उजवा कालवा १० जूननंतरच सुरू होणार

उपलब्ध पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २४ मे २०२४ | फलटण |
नीरा उजवा कालव्याद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असलेल्या फलटण नगर परिषद, गिरवी व निंबळक प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, फलटण तालुक्यातील १५ व माळशिरस तालुक्यातील एका ग्रामपंचायतीस नीरा उजवा कालव्यातून दि. १० जूनपूर्वी पाणीपुरवठा होऊ शकणार नसल्याने आपल्याकडील उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करून काटकसरीने वापर करण्याचे आवाहन नीरा उजवा कालवा फलटण उपविभागाचे सहाय्यक अभियंता (श्रेणी १) अमोल मस्कर यांनी पत्राद्वारे केले आहे.

नीरा उजवा कालव्याचे उन्हाळी हंगाम सन २०२३/२४ चे सिंचन आवर्तन कालव्याची (कि. मी. ४९/९९० मधील) दुरुस्ती करावयाची असल्याने बंद झाले आहे, तथापि आपल्या पाणीपुरवठा योजनेचा तलाव कालवा सुरू असताना नीरा उजवा कालव्याद्वारे पूर्ण क्षमतेने म्हणजेच १०० % भरून देण्यात आला असल्याचे या पत्राद्वारे निदर्शनास आणून देत आपल्या अधिनस्त असलेल्या तलावातील पिण्याचे पाणी दि. १५ जूनपर्यंत पुरेल असे नियोजन करावे. आपणास दि. १० जूनपूर्वी कोणत्याही परिस्थितीत पाणी देता येणार नसल्याचे या पत्रात नमूद असून याची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सदर पत्र ग्रामपंचायत तरडगाव, सुरवडी, वाठार निंबाळकर, निंभोरे, साखरवाडी, वडजल, ढवळेवाडी, सोमंथळी, विडणी, फरांदवाडी, जाधववाडी, सांगवी, पिंप्रद, पवारवाडी, साठे, निंबळक/ वाजेगाव तसेच ग्रामपंचायत निंबळक प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना, मौजे गुरसाळे, ता. माळशिरस नळ पाणीपुरवठा योजना आणि मुख्याधिकारी, फलटण नगर परिषद फलटण आदींना पाठविण्यात आले आहे.

सदर पत्राच्या प्रती कार्यकारी अभियंता, नीरा उजवा कालवा विभाग, फलटण यांना माहितीसाठी आणि शाखाधिकारी, पाटबंधारे शाखा तडवळी, फलटण, निंबळक, धर्मपुरी यांना माहितीसाठी व पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!