महाराष्ट्र राज्य एकल प्राथमिक शिक्षक सेवा मंच अध्यक्षांचा विदर्भ मराठवाडा दौरा यशस्वी


दैनिक स्थैर्य | दि. २४ मे २०२४ | फलटण |
प्राथमिक शिक्षकांना अध्यापनाव्यतिरिक्त दिली जात असलेली अशैक्षणिक कामे, ऑनलाईन नोंदी वगैरेंसाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करून प्राथमिक शिक्षकांना केवळ आध्यापनाचे काम देवून गुणवान पिढी घडविण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवावी, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य एकल प्राथमिक शिक्षक सेवा मंचचे अध्यक्ष विकास खांडेकर यांनी केली आहे.

सातारा जिल्हा परिषदेच्या जावली, ता. फलटण येथील प्राथमिक शाळेतील उपशिक्षक विकास खांडेकर यांच्यावर नुकतीच महाराष्ट्र राज्य एकल प्राथमिक शिक्षक सेवा मंच अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली असून त्यांनी सुट्टीच्या कालावधीत विदर्भ मराठवाड्याचा दौरा करून अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, अकोला, भंडारा आदी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हास्तरावर बैठका घेऊन त्यांचे प्रश्न समजावून घेत त्यांना मार्गदर्शन केले, एकल प्राथमिक शिक्षक सेवा मंच नूतन पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या करून विदर्भ मराठवाड्यातील संघटनेचे काम गतिमान केले आहे.

प्राथमिक शाळेतच विद्यार्थी घडविण्याची प्रक्रिया सुरू होत असून तेथील शिक्षकांवर अशैक्षणिक कामाचा बोजा वाढला तर त्यांचे अध्यापनाकडे दुर्लक्ष झाल्याने गुणवान भावी पिढी घडविण्याची प्रक्रिया अपूर्ण राहिल्याने देशाचे मोठे नुकसान होण्याचा धोका लक्षात घेऊन प्राथमिक शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुभा द्यावी, अशी आग्रही मागणी विकास खांडेकर यांनी या दौर्‍यात विविध ठिकाणच्या प्राथमिक शिक्षक सभा, बैठकांमध्ये केली असून लवकरच याबाबत सविस्तर निवेदन तयार करून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री यांची आपल्या सहकार्‍यांसह भेट घेऊन या प्रमुख मागणीसह शिक्षकांच्या अन्य मागण्या त्यांच्याकडे करणार असल्याचेही खांडेकर यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले आहे.

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या, मेडिक्लेम, आयकर, शालेय पोषण आहार मानधन, बीएलओ काम देवू नये, पटसंख्या विशेषतः पूर्वी ६०/६१ पटसंख्येला तिसरा शिक्षक दिला जात असे. ती पद्धत कायम ठेवावी. प्राथमिक शिक्षकांना वेळेत पदोन्नती दिली जावी, इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती आणि विद्यार्थ्यांना १ रुपया उपस्थिती भत्ता या योजना प्राधान्याने राबवाव्यात आदी मागण्यांबाबत या सर्व जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी आपल्या मागण्या प्रभावीपणे मांडल्या असून त्या सर्व प्रश्नांची सोडवणूक प्राधान्याने करण्याची ग्वाही राज्याध्यक्ष विकास खांडेकर यांनी दिली आहे.

विदर्भ मराठवाड्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांबाबत त्यांच्याशी बोलल्यानंतर जिल्हा परिषद शिक्षण विभागातील काही अधिकार्‍यांच्या भेटी घेऊन आपण त्यांच्याशी प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नाबाबत चर्चा केल्याचे विकास खांडेकर यांनी आवर्जून सांगितले.

या दौर्‍यात राज्याध्यक्ष विकास खांडेकर यांना अमरावती जिल्ह्यात उमेश वाघ, देवेंद्र खैर, सुनीता लहाने, यवतमाळ जिल्ह्यात शशिकांत लोळगे, विनोद खरुलकर, वर्धा जिल्ह्यात छत्रपती फाटे, नागपूर जिल्ह्यात सुधाकर मते, गोंदिया जिल्ह्यात कांतीलाल भेलावे, अकोला जिल्ह्यात संदीप भुट्टे या प्रमुखांसह त्यांच्या सहकार्‍यांनी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांशी संपर्क करून त्यांच्या बैठका लावण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

विदर्भ मराठवाडा दौर्‍यामुळे या जिल्ह्यातील संघटना बळकटीबरोबर प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांना चालना मिळणार असल्याने प्राथमिक शिक्षकांमध्ये चैतन्याचे वातावरण दिसून आल्याचे राज्याध्यक्ष विकास खांडेकर यांनी सांगितले.

याबाबत विकास खांडेकर यांनी अमरावती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी बुद्धभूषण सोनोने यांची सदिच्छा भेट घेऊन प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांसंबंधी त्यांना निवेदन दिले. त्यांच्यासमवेत उमेश वाघ, देवेंद्र खैर, गजानन निचत, सतीश ढगे वगैरे प्राथमिक शिक्षक उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!