
दैनिक स्थैर्य । 21 जून 2025 । फलटण । लोणंद येथील मालोजीराजे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम प्रचार तसेच पालखी सोहळा नियोजनासंबंधी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) धनंजय चोपडे उपस्थित होते.
धनंजय चोपडे म्हणाले, वारकर्यांना सेवा देणे हीच आपली या पालखी सोहळ्यातील ईश्वर सेवा मानून आनंदाने सेवा करावी. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीतील वारकर्यांमध्ये शिक्षणाचे महत्त्व काय आहे हे समजावून सांगण्यासाठी शिक्षकांनी सेवा करावी.
शिक्षणाधिकारी (योजना) अनिस नायकवडी यांनी खंडाळा व फलटण तालुक्यातील सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांना पालखी सोहळ्यातील नियोजनाची माहिती दिली. ज्ञानेश्वर महाराज पालखीचे स्वागत पालखी मार्गावरील शाळांनी विद्यार्थ्यांच्या सहाय्याने साक्षरतेची घोषवाक्य देऊन करावे. तसेच विविध पथनाट्य, घोषवाक्य, बॅनर्स, लोगो इत्यादी तयार करून साक्षरतेचा प्रचार करण्याचे आवाहन केले.
खंडाळ्याचे गटशिक्षण अधिकारी गजानन आडे, फलटणचे गटशिक्षण अधिकारी अनिल संकपाळ यांनी वारीतील कार्यक्रमाची पालखी समोर घोषवाक्य, चित्ररथ तसेच साक्षरता गीते सादर करून पालखीचे स्वागत करावे असे आवाहन केले. तसेच असाक्षर वारकर्यांचे फॉर्म भरून नोंद करण्यास सांगितले.
प्राचार्य चंद्रकांत जाधव यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमास खंडाळा व फलटण तालुक्यातील सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक इत्यादी मान्यवर उपस्थित होते. प्राध्यापक महेश जाधव यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य आबाजी धायगुडे यांनी आभार मानले.