मुन्शी प्रेमचंद यांनी सामाजिक वास्तवाचे मानवतावादी लेखन केले : डॉ. प्रभाकर पवार

मुन्शी प्रेमचंद यांनी सामान्य माणसाचा जीवनसंघर्ष साहित्यातून मांडताना दारिद्र्य, शोषण, जातीभेद आणि सामाजिक विषमतेवर भाष्य केले. त्यांच्या लेखनातून अन्यायाविरुद्ध संघर्षाची प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन डॉ. प्रभाकर पवार यांनी केले.

स्थैर्य, फलटण, दि. २८ ऑगस्ट : मुन्शी प्रेमचंद हे राष्ट्रीय विचारांचे आणि समाजातील वास्तव जीवन शब्दबद्ध करणारे मानवतावादी लेखक होते. त्यांनी शेतकरी, शेतमजूर, गरीब, दलित, वंचित आणि स्त्रियांच्या जीवनातील प्रश्न कथा-कादंबऱ्यांमधून मांडले. सामान्य माणसाच्या जीवनसंघर्षाला साहित्याच्या केंद्रस्थानी आणून अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याचे सामर्थ्य दिले, असे प्रतिपादन मुधोजी महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. प्रभाकर पवार यांनी केले.

मुधोजी महाविद्यालयाच्या हिंदी भाषा विभागाच्या वतीने हिंदी व उर्दू साहित्यिक मुन्शी प्रेमचंद यांच्या १४६ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सविता नाईक निंबाळकर होत्या. डॉ. नवनाथ रासकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

सामान्य माणसाचे जीवन साहित्यात आणले

डॉ. पवार म्हणाले की, स्वातंत्र्याच्या राष्ट्रीय चळवळीत सहभागी झालेल्या प्रेमचंद यांनी भारतीय समाजाच्या विविध स्तरांतील जीवनाचे निरीक्षण करून हिंदी आणि उर्दू साहित्यात सामान्य माणसाच्या वास्तव जीवनाचे चित्रण केले.

‘गोदान’, ‘गबन’, ‘निर्मला’, ‘कर्मभूमी’, ‘रंगभूमी’ आणि ‘सेवासदन’ यांसारख्या कादंबऱ्यांसह त्यांनी २०० हून अधिक कथा लिहिल्या. साधी, सहज आणि लोकाभिमुख भाषा वापरत त्यांनी शेतकरी, गरीब, दलित आणि स्त्रियांच्या समस्या मांडल्या. सामाजिक विषमता, दारिद्र्य, शोषण, अन्याय, वंचितता आणि उपेक्षिततेविरोधात त्यांच्या लेखनातून मानवतावादी मूल्यांचा आग्रह दिसून येतो, असे डॉ. पवार यांनी सांगितले.

तरुण पिढीने प्रेमचंद यांच्या लेखनातून प्रेरणा घ्यावी

राष्ट्रीय एकात्मतेला महत्त्व देतानाच प्रेमचंद यांनी स्त्रियांची सामाजिक स्थिती आणि त्यांचा संघर्ष प्रभावीपणे मांडला. दलित, वंचित आणि उपेक्षित समाजाच्या प्रश्नांनाही त्यांनी आपल्या साहित्यात स्थान दिले, असे डॉ. पवार यांनी नमूद केले.

आजच्या तरुण पिढीने आणि लेखकांनी प्रेमचंद यांच्या लेखनातील मानवी मूल्ये, राष्ट्रीय एकात्मता आणि मानवतावादी विचारांतून प्रेरणा घ्यावी. तसेच वर्तमानातील सामाजिक प्रश्न आणि समस्यांना लेखनातून वाचा फोडावी, असे आवाहन त्यांनी केले.

‘विद्यार्थ्यांनी प्रेमचंद यांचे साहित्य वाचावे’

अध्यक्षीय मनोगतात डॉ. सविता नाईक निंबाळकर म्हणाल्या की, देशभक्ती आणि लोककल्याणाच्या भावनेने लेखन करणाऱ्या साहित्यिकांमध्ये प्रेमचंद यांचे स्थान महत्त्वाचे आहे. स्त्री जीवनाची जाण आणि भारतीय समाजाचे वास्तव ओळखून त्यांनी मानवी मूल्ये व साहित्य मूल्यांची सांगड घातली.

राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीबरोबरच सामाजिक सुधारणा आणि सामाजिक स्वातंत्र्याच्या विचारांना प्रेमचंद यांनी लेखनातून प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांनी त्यांचे साहित्य आवर्जून वाचावे, असे आवाहन त्यांनी केले.

विद्यार्थ्यांची उपस्थिती

मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंढरीनाथ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. किरण सोनवलकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते. प्रा. सोनवलकर यांनी आभार मानले.

मुन्शी प्रेमचंद यांच्या १४६ व्या जयंतीनिमित्त मुधोजी महाविद्यालयात कार्यक्रम; सामाजिक वास्तव आणि मानवतावादी साहित्यावर डॉ. प्रभाकर पवार यांचे मार्गदर्शन.

Back to top button
Don`t copy text!