
थेट WhatsApp वर मिळवा
कोपरगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत फलटणच्या मुधोजी हायस्कूलच्या मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावून सलग दुसऱ्या वर्षी राष्ट्रीय स्पर्धेत धडक मारली आहे.
स्थैर्य, फलटण, दि. ०८ ऑक्टोबर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव येथे आयोजित नेहरू राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या विजयामुळे दिल्ली येथे होणाऱ्या नेहरू राष्ट्रीय चषक हॉकी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करण्याचा मान सलग दुसऱ्या वर्षी मुधोजी हायस्कूलच्या संघाने मिळवला आहे. सातारा जिल्ह्यातील सलग दोन वर्षे राष्ट्रीय नेहरू चषक स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करणारा हा पहिलाच मुलींचा हॉकी संघ ठरला आहे.
राज्यातील ९ दिग्गज संघांवर मात करत पटकावले विजेतेपद
या राज्यस्तरीय स्पर्धेत कोल्हापूर, पुणे, मुंबई, लातूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर आणि क्रीडा प्रबोधिनी अशा राज्यातील नऊ विभागांच्या मातब्बर संघांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेत गायत्री खरात, अनघा केंजळे, सिद्धी केंजळे, वेदिका वाघमोरे, श्रद्धा यादव, श्रावणी राहिगुडे व साक्षी चव्हाण यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत गोल डागले. मधल्या फळीत मानसी पवार, गौरी हिरनवाळे, समृद्धी बनकर, नंदिनी शिंदे व श्रावणी ननावरे यांनी भक्कम खेळ केला. बचाव फळीत अनुष्का केंजळे व मृण्मयी घोरपडे यांनी प्रतिस्पर्ध्यांचे आक्रमण मोडून काढले, तर गोलकीपर आरोही पाटील हिने अत्यंत चमकदार कामगिरी बजावली.
मार्गदर्शक आणि मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव
या यशस्वी संघाला ज्येष्ठ हॉकी मार्गदर्शक महेश खुटाळे, हॉकी प्रशिक्षक सचिन धुमाळ, संघ व्यवस्थापक धनश्री क्षीरसागर तसेच फिटनेस ट्रेनर ऋषिकेश पवार व विनय नेरकर यांचे मार्गदर्शन लाभले. हा संघ १० ते २० ऑक्टोबरदरम्यान दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल रामराजे नाईक-निंबाळकर, दीपक चव्हाण, रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, संजीवराजे नाईक-निंबाळकर, शिवाजीराव घोरपडे, अरविंद निकम आणि प्राचार्य वसंतराव शेडगे यांसह क्रीडाप्रेमींनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


