
एसटीची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी विनावाहक बससेवा, डिजिटल तिकीट प्रणाली आणि उपलब्ध मनुष्यबळाचा कार्यक्षम वापर करण्यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले.
स्थैर्य, मुंबई, दि. ०२ सप्टेंबर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उत्पन्नवाढीसोबत खर्चात बचत करण्यावर भर देण्याची गरज आहे. त्यासाठी विनावाहक बससेवेला प्राधान्य देऊन मनुष्यबळावरील खर्च कमी करावा आणि प्रवाशांना अधिक सुलभ सेवा द्यावी, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या आर्थिक स्थितीबाबतच्या उपाययोजनांचा आढावा घेताना दिले.
तिकीट दरवाढीऐवजी उत्पन्नाचे नवे स्रोत
एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केवळ तिकीट दरवाढ हा पर्याय नसल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करणे, अनावश्यक खर्च कमी करणे आणि उपलब्ध मनुष्यबळ व संसाधनांचा कार्यक्षम वापर करणे या बाबींवर एकाच वेळी लक्ष केंद्रित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
प्रवाशांना अधिक चांगली सेवा देत उत्पन्न वाढवणे आणि त्याचवेळी खर्च कमी करणे हा शाश्वत मार्ग असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. पारंपरिक कार्यपद्धतीच्या चौकटीबाहेर जाऊन नाविन्यपूर्ण प्रयोग राबवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
विनावाहक सेवेसाठी डिजिटल तंत्रज्ञानावर भर
विनावाहक बससेवेमुळे काही मार्गांवरील वाहकाचा खर्च कमी होण्यास मदत होऊ शकते. डिजिटल तिकीट प्रणाली, क्यूआर कोड, स्मार्ट कार्ड आणि इतर आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून ही सेवा सक्षम करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यास सरनाईक यांनी सांगितले.
एसटीचा आर्थिक तोटा कमी करताना प्रवाशांचा विश्वास अधिक मजबूत करण्यावरही भर देण्यात आला आहे. प्रवाशांच्या गरजा, बदलती प्रवास पद्धत आणि स्थानिक मागणी लक्षात घेऊन प्रवासीभिमुख योजना राबवाव्यात. प्रवाशांना वेळेत, सुरक्षित, स्वच्छ आणि विश्वासार्ह सेवा देताना त्यांच्या हिताशी तडजोड न करता आधुनिक, कार्यक्षम आणि किफायतशीर सेवा देण्यावर भर राहील, असे सरनाईक यांनी सांगितले.
