
दैनिक स्थैर्य | दि. २ सप्टेंबर २०२६ | नवी दिल्ली |
जागतिक पातळीवरील उलथापालथ, भू-राजकीय संघर्ष आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर ७.८ टक्के जीडीपी गाठल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशातील जनतेचे कौतुक केले. विकास दराची ही गती कायम ठेवायची असल्यास परदेशी न जाण्याचे, परदेशात लग्नसमारंभ न आयोजित करण्याचे किंवा सोने न खरेदी करण्याचे आवाहन त्यांनी केले. लोकांनी भारतातच लग्न सोहळे आयोजित करावे, असे आवाहन त्यांनी केले.
तसेच मोदी यांनी राहुल गांधी यांच्या ‘छात्रो की गूंज’वर ‘झूठ की गूंज’ असे म्हणत जोरदार निशाणा साधला. या नवीन जीडीपी वृद्धी दराने भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल पसरवल्या जाणार्या ‘निराशावादाचा’ बुरखा फाडला आहे. भारताला विकास दर कायम ठेवण्यासाठी अधिक स्वावलंबन व ’स्वदेशी’च्या दिशेने कार्य करत राहिले पाहिजे, असे ते म्हणाले.