
डॉ. राजेंद्र रूपनवर यांच्या आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी फलटणमध्ये हजारो नागरिक जमले. आरोग्य विभागाने सखोल चौकशीसह दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले.
स्थैर्य, फलटण, दि. ०२ सप्टेंबर : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील तत्कालीन तदर्थ वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रूपनवर यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या मागण्यांसाठी बुधवारी हजारो नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयासमोर घेराव घातला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी सकाळपासून कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. कुटुंबीयांच्या मागण्या शासनाकडे पाठवण्याचे प्रशासनाने, तर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर नियमानुसार कारवाई करण्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाने आश्वासन दिले.
हजारोंचा जमाव; प्रशासनाकडून मागण्यांवर कार्यवाहीचे आश्वासन
फलटण पोलीस उपविभागाचे उपविभागीय अधिकारी धन्यकुमार गोडसे यांनी सकाळपासून उपजिल्हा रुग्णालयात तळ ठोकून बंदोबस्ताचे नियोजन केले. त्यानंतर नागरिकांची संख्या वाढत गेली आणि अवघ्या एका तासात रुग्णालयासमोर हजारो नागरिक जमा झाले.
दुपारी तीनच्या सुमारास फलटणच्या प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांनी उपजिल्हा रुग्णालयात येऊन रूपनवर कुटुंबीयांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनातील सर्व मागण्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तातडीने शासनाकडे पाठवण्याचे आश्वासन दिले. मागण्या तातडीने मान्य झाल्याशिवाय शांत बसणार नसल्याची भूमिका उपस्थित नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली.
एसआयटी स्थापनेसाठी अहवाल शासनाकडे पाठवणार
या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याबाबतचा अहवाल जिल्हा पोलीस प्रमुखांकडून शासनाकडे पाठवण्यासाठी आवश्यक कार्यवाही बुधवारीच पूर्ण केली जाईल, असे धन्यकुमार गोडसे यांनी सांगितले.
डॉ. राजेंद्र रूपनवर यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या मागणीनंतर सार्वजनिक आरोग्य विभागानेही प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर नियमानुसार योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकांनी दूरध्वनीवरून डॉ. रूपनवर यांच्या पत्नीशी चर्चा करून कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि प्रकरणाची माहिती घेतली.
आरोग्य विभागाकडून सखोल चौकशीचे लेखी आश्वासन
सार्वजनिक आरोग्य विभाग रूपनवर कुटुंबीयांच्या पाठीशी असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर नियमानुसार योग्य कारवाई केली जाईल, असे कुटुंबीयांना आश्वस्त करण्यात आले आहे. तसेच कुटुंबीयांनी प्रशासनाला सहकार्य करावे, अशी विनंती आरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी पत्राद्वारे केली आहे.
आरोग्य विभागाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर नागरिकांनी डॉ. रूपनवर यांचे पार्थिव उपजिल्हा रुग्णालयातून त्यांच्या मूळगावी फडतरी (मांडवी), ता. माळशिरस येथे अंत्यविधीसाठी नेले.
