
थेट WhatsApp वर मिळवा
उद्योगक्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेची वाढती मागणी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमात एआय टूल्स व आधुनिक सॉफ्टवेअरचा समावेश केला आहे.
स्थैर्य, सातारा, दि. २६ नोव्हेंबर : तंत्रज्ञान क्षेत्रातील वेगाने होणारे बदल आणि उद्योगांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित कौशल्यांची वाढती मागणी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने (एमएसबीटीई) अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमात महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. विद्यार्थ्यांना भविष्यातील रोजगार, उद्योजकता आणि उच्च शिक्षणासाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने विविध विषयांच्या अभ्यासक्रमात एआय टूल्स, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि आधुनिक सॉफ्टवेअर तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या सम सत्रापासून (इव्हन सेमिस्टर) या सर्व बदलांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक यांनी संस्थांना दिल्या आहेत.
एआय चॅटबॉट आणि गिटहबचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण
नव्या सुधारणांनुसार, ‘फंडामेंटल्स ऑफ आयसीटी’ या विषयात चॅटजीपीटी, ग्रोक, पर्प्लेक्सिटी, जेमिनी, को-पायलट आणि क्लॉड यांसारख्या एआय चॅटबॉटची ओळख करून दिली जाणार आहे. या टूल्सचा उपयोग, कार्यपद्धती आणि डिजिटल सहकार्य याबरोबरच गिटहब प्लॅटफॉर्मवर खाते तयार करणे, रिपॉझिटरी व्यवस्थापन आणि डिजिटल दस्तऐवज प्रकाशित करण्याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तसेच प्रोग्रामिंग इन सी, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, जावा, पायथॉन आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग या विषयांच्या सेल्फ लर्निंग असेसमेंटमध्ये गिटहब व एआय प्लॅटफॉर्मशी संबंधित असाइनमेंटचा समावेश करण्यात आला आहे.
आधुनिक सॉफ्टवेअर आणि प्रकल्पाधारित शिक्षणावर भर
जावा स्क्रिप्ट विषयात यापूर्वीच्या अँग्युलर जेएसवर आधारित घटकांच्या जागी आता डायनॅमिक वेबपेज तयार करणे आणि इनबिल्ट फंक्शन्स व ऑब्जेक्ट्सचा वापर शिकविण्यावर भर दिला जाणार आहे. मोबाईल अॅप्लिकेशन डेव्हलपमेंटमध्ये रिअॅक्ट नेटिव्ह फ्रेमवर्कची ओळख करून देण्यात आली असून, त्यासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा प्रशिक्षणाद्वारे प्राथमिक मोबाईल अॅप तयार करण्याचे धडे दिले जातील. पारंपरिक अभ्यासक्रमासोबत आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रत्यक्ष प्रकल्पाधारित शिक्षणाची सांगड घातल्याने विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्रातील गरजांनुसार कौशल्ये आत्मसात करणे सोपे होणार आहे.



