राज्यात कामगार आणि औद्योगिक न्यायालये बंद होणार; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

केंद्राच्या नवीन कामगार संहितांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगार आणि औद्योगिक न्यायालये बंद करून औद्योगिक प्राधिकरण स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

स्थैर्य, सातारा, दि. २६ नोव्हेंबर : केंद्र सरकारने देशभरात लागू केलेल्या चार नवीन कामगार संहितांच्या अनुषंगाने राज्यातील कामगारविषयक कायद्यांमध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. या सुधारणांनुसार राज्यातील विद्यमान कामगार आणि औद्योगिक न्यायालये बंद केली जाणार असून, त्यांच्या जागी नवीन औद्योगिक न्यायाधिकरण स्थापन केले जाणार आहे. तसेच, माथाडी, हमाल, इतर श्रमजीवी आणि खासगी सुरक्षा रक्षक कायद्यांमध्ये सुधारणा करण्यासही मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.

दंडात्मक कारवाईचे अधिकार न्याय दंडाधिकाऱ्यांकडे

नवीन औद्योगिक संबंध संहितेनुसार कामगारविषयक न्यायनिवाडा यंत्रणेच्या रचनेत मोठा बदल होणार आहे. नवीन औद्योगिक न्यायाधिकरणाला माथाडी कायद्यांतर्गत गुन्ह्यांसाठी दंड किंवा शिक्षा सुनावण्याचे अधिकार नसतील. त्यामुळे महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम आणि महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक अधिनियमांचे उल्लंघन करणाऱ्या उद्योजकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार मुख्य न्याय दंडाधिकारी आणि अतिरिक्त न्यायिक अधिकाऱ्यांकडे सोपविण्याची तरतूद करण्यात आली आहे.

कायद्यांमध्ये सुसंगत बदल का गरजेचे?

केंद्र सरकारच्या वेतन संहिता, औद्योगिक संबंध संहिता, सामाजिक सुरक्षा संहिता आणि व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य संहितेमध्ये राज्याच्या माथाडी व खासगी सुरक्षा रक्षक कायद्यांचा समावेश नव्हता. त्यामुळे या दोन्ही राज्य कायद्यांतील तरतुदी नवीन केंद्रीय संहितांसोबत सुसंगत करणे आवश्यक होते. यापूर्वी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या उद्योजकाला पहिल्या गुन्ह्यासाठी पाच लाख रुपये, तर गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास दहा लाख रुपयांपर्यंत दंड कामगार किंवा औद्योगिक न्यायालयांमार्फत सुनावला जात होता. आता हा निर्णय नवीन कायदेशीर व्यवस्थेनुसार घेतला जाणार आहे.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!