जातवैधता प्रमाणपत्रासाठीची धावपळ थांबणार; आता ईमेल आणि व्हॉट्सॲपवर मिळणार प्रमाणपत्र

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

राज्यातील विद्यार्थी आणि नागरिकांसाठी जातवैधता प्रमाणपत्राची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली असून, आता थेट ईमेल व व्हॉट्सॲपवर प्रमाणपत्र मिळणार आहे.

स्थैर्य, सातारा, दि. २६ नोव्हेंबर : राज्यातील विद्यार्थी आणि नागरिकांना जातवैधता प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता अर्ज व कागदपत्रे सादर करण्यापासून ते ऑनलाइन सुनावणीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ‘जात प्रमाणपत्र पडताळणी माहिती प्रणाली’द्वारे (सीसीव्हीआयएस) ऑनलाइन राबवली जाणार आहे. विशेष म्हणजे, पडताळणी पूर्ण झाल्यानंतर उपायुक्तांच्या डिजिटल स्वाक्षरीसह प्रमाणपत्र थेट अर्जदाराच्या ईमेल आणि व्हॉट्सॲपवर पाठवले जाणार आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.

कार्यालयात मुद्रित प्रती जमा करण्याची गरज नाही

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) यांच्या सहकार्याने ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे अर्जदारांना घरबसल्या अर्जाची सद्यस्थिती तपासता येईल, तसेच एआय चॅटबॉटद्वारे मार्गदर्शनही मिळेल. सर्व मूळ किंवा प्रमाणित कागदपत्रे आणि शपथपत्रे स्कॅन करून केवळ ऑनलाइन पद्धतीनेच अपलोड करायची आहेत. त्यानंतर त्यांची मुद्रित प्रत कार्यालयात जमा करण्याची आवश्यकता राहणार नाही. अर्ज आधार क्रमांकाशी निगडित असल्याने एकच अर्ज दाखल करता येईल. रहिवासाचा किंवा जात नोंदीचा पुरावा नसल्यास स्वयंघोषणापत्र देण्याची मुभाही देण्यात आली आहे.

६० दिवसांत निर्णय आणि सुधारित सेवा शुल्क

पडताळणी प्रक्रियेत तांत्रिक व गुणवत्ता तपासणीनंतर आवश्यकता भासल्यास व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेतली जाईल. अर्जदाराला दूरदृश्यप्रणालीद्वारे सुनावणीची वाजवी संधी दिल्याशिवाय दावा अवैध ठरवता येणार नाही. समिती शक्यतो ६० दिवसांच्या आत यावर निर्णय घेईल. त्रुटी पूर्ततेसाठी दोन महिने व पाचव्या महिन्यात अंतिम सुनावणीची संधी दिली जाईल. दरम्यान, प्रमाणपत्रासाठीचे शुल्क सुधारित करण्यात आले असून, शैक्षणिक प्रयोजनासाठी १०० रुपये, तर निवडणूक आणि इतर प्रयोजनासाठी ५०० ते १ हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!