
थेट WhatsApp वर मिळवा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली असून, विविध परीक्षांच्या पदसंख्येत मोठी वाढ करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
स्थैर्य, सातारा, दि. ०५ नोव्हेंबर : स्पर्धा परीक्षा आणि एमपीएससीच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या उच्चस्तरीय व्ही. राधा समितीने आपला महत्त्वपूर्ण अहवाल सादर केला आहे. या अहवालात परीक्षा प्रक्रियेची सुरक्षितता वाढवण्यासोबतच वयोमर्यादेत सवलत देण्याबाबत आणि रिक्त पदांच्या संख्येत भरघोस वाढ करण्याबाबत महत्त्वाच्या शिफारशी करण्यात आल्या आहेत.
परीक्षा पदसंख्येत वाढ
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राबविल्या जाणाऱ्या गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी यंदा सुमारे १२ लाख उमेदवारांनी अर्ज केले असून, सध्या ५ हजारांहून अधिक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. मात्र, विविध विभागांकडून आणखी ११ हजारांहून अधिक पदांची मागणी आयोगाकडे नोंदवली गेली आहे. ही अतिरिक्त पदे शुद्धिपत्रकाद्वारे समाविष्ट करून एकूण पदसंख्या १६ हजारांपेक्षा अधिक करण्याची शिफारस या समितीने केली आहे.
सुरक्षा आणि पारदर्शकतेवर भर
स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना आणि इतर तांत्रिक त्रुटी टाळण्यासाठी परीक्षा प्रक्रियेत कडेकोट सुरक्षा उपाययोजना राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, परीक्षांचा कालावधी कमी करून वेळेत निकाल जाहीर करण्याची मागणी विद्यार्थी करत होते, ज्यावर या समितीच्या शिफारशींमुळे मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.





