
थेट WhatsApp वर मिळवा
एमपीएससी कृषी सेवा मुख्य परीक्षेच्या मूल्यमापनात मोठा गोंधळ उघडकीस आला असून उत्तरपत्रिकांच्या फेरतपासणीची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
स्थैर्य,सातारा, दि. १५ सप्टेंबर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कृषी सेवा मुख्य परीक्षा-२०२४ च्या मूल्यमापन प्रक्रियेवर विद्यार्थ्यांनी गंभीर आक्षेप घेतले आहेत. माहिती अधिकारातून प्राप्त झालेल्या गुणपत्रिका आणि उत्तरपत्रिकांच्या आधारे मूल्यमापन प्रक्रियेत मोठी विसंगती दिसून येत आहे. काही प्रकरणांमध्ये पहिल्या परीक्षकाने दिलेल्या गुणांमध्ये नियामकांनी कपात केल्याने मूळ गुणांच्या तुलनेत तब्बल ४९ टक्क्यांची घट झाल्याचे समोर आले आहे.
गुणदानातील तफावतीमुळे संशय
काही उत्तरपत्रिकांमध्ये पहिल्या परीक्षकाने संबंधित उमेदवाराला १३५ गुण दिल्यानंतर नियामकाने हे गुण १०१ आणि दुसऱ्या नियामकाने अधिक कमी करून ६८ वर आणल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे एकाच उत्तरपत्रिकेच्या मूल्यमापनात ६७ गुणांची तफावत कशी निर्माण झाली, असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. तसेच काही प्रश्नांना अपेक्षित उत्तर नसतानाही अधिक गुण दिल्याचे प्रकार उघडकीस आल्याने प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
उत्तरपत्रिकांच्या फेरतपासणीची मागणी
कृषी विज्ञान, कृषी अभियांत्रिकी, अन्नतंत्रज्ञान यांसारख्या विविध शाखांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन संबंधित विषयतज्ज्ञांकडून झाले होते का, याची माहिती जाहीर करण्याची मागणी होत आहे. या सर्व शंकांचे निरसन होईपर्यंत कृषी सेवा मुख्य परीक्षेच्या निकालावर आधारित पुढील सर्व प्रक्रिया स्थगित ठेवावी आणि उत्तरपत्रिकांची पुनर्मूल्यांकन प्रक्रिया राबवावी, अशी आक्रमक भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.