
दैनिक स्थैर्य । दि. २७ मार्च २०२२ । फलटण । माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या आर्थिक फसवणुकीबाबत दि. २३ मार्च पासून आमरण उपोषणाला बसलेलो आहे. प्रशाशन हे उपोषणाची दखल घेत नसून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा प्रशाशन न्याय देईल असे मला वाटत नाही. आगामी काळामध्ये माझ्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर त्याला सर्वस्वी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हेच जबाबदार आहेत, असे दिगंबर आगवणे यांनी स्पष्ट केले.
फलटण येथील प्रांताधिकारी कार्यालयाच्या बाहेर दिगंबर आगवणे हे उपोषणाला बसलेले आहेत. त्याठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आगवणे बोलत होते.
माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माझी मोठी अशी आर्थिक फसवणूक केलेली आहे. स्वराज कारखाना व स्वराज पतसंस्थेच्या माध्यमातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व त्यांच्या संचालक मंडळांनी वेळोवेळी खोटी बिले व पावती बनवून आर्थिक फसवणूक केलेली आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह कारखाना व पतसंस्थेच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी दिगंबर आगवणे यांनी प्रशासनाकडे केलेली आहे.
जो पर्यंत मला न्याय मिळत नाही व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह स्वराज कारखाना व पतसंस्थेच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल होत नाही, तो पर्यंत आपण उपोषण सोडणार नाही. यासोबतच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून सीतामाईच्या घाटामधील मुरुमाचे उत्खनन केलेले आहे. त्याबाबत वन विभागाने अज्ञात्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. संपूर्ण तालुक्याला माहित आहे कि त्याठिकाणी कोणी उत्खनन केलेले आहे. तरी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांच्या वर गुन्हे दाखल करा त्यानंतरच मी उपोषण सोडीन, असे दिगंबर आगवणे यांनी यावेळी स्पष्ट केले.