फलटण – पंढरपूर रेल्वे प्रश्‍नाकडे खा.रणजितदादांनी वेधले पंतप्रधानांचे लक्ष


स्थैर्य, फलटण दि. 11 : फलटण – पंढरपूर रेल्वे मार्गासाठी महाराष्ट्र सरकार 50 टक्के वाटा उचलण्यास तयार असल्याचे पत्र तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय रेल्वे खात्याला दिले होते. मात्र राज्यात सत्तापालट झाल्यानंतर विद्यमान राज्यसरकार पक्षपाती भूमिकेतून या रेल्वे मार्गासाठी सहकार्य करत नसल्याने आपण वैयक्तीक लक्ष घालून असंख्य भाविकांच्या आस्थेचा प्रश्‍न असलेल्या फलटण – पंढरपूर या रेल्वे मार्गाच्या पूर्ततेसाठी निधीची उपलब्धता करुन द्यावी, अशी मागणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मतदार संघातील विविध प्रश्‍नांबाबत नुकतीच नवी दिल्ली येथे पंतप्रधान कार्यालयात नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यावेळी वरील विनंती त्यांनी केली.

सदर योजनेबाबत पंतप्रधानांना सविस्तर माहिती देताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले की, ब्रिटिश काळापासून फलटण – पंढरपूर रेल्वेच्या संदर्भामध्ये चर्चा सुरू आहे. पंढरपूर हे महाराष्ट्रातील हे प्रसिद्ध देवस्थान आहे. या ठिकाणी विठूरायाच्या दर्शनासाठी असंख्य श्रद्धाळू भाविक दरवर्षी आषाढी व कार्तिकी यात्रेसाठी येत असतात. फलटण पर्यंत रेल्वेचे काम पूर्ण झालेले असून पुढील फलटण ते पंढरपूर रेल्वेच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यास तीर्थ क्षेत्राबरोबरच या भागाचा आर्थिक विकास खूप मोठ्या प्रमाणामध्ये होईल. तसेच बेरोजगारांचा प्रश्‍न सुद्धा बर्‍यापैकी मार्गी लागेल. या कामाच्या बाबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी 2018 या वर्षामध्ये 108 किलोमीटर रेल्वे लाईनच्या संदर्भामध्ये राज्य शासन 50 टक्के वाटा उचलण्यास तयार आहे अशा आशयाचे पत्र केंद्रीय रेल्वे मंत्री यांना देण्यात आले होते. परंतु राज्यामध्ये सत्ताबदल झाल्यानंतर ही योजना पुढे नेहण्यास विद्यमान सरकार उत्सुक दिसत नाही. याबाबत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी राज्य सरकारला एक पत्र देऊन या योजनेस सहकार्य करण्याची विनंती केली परंतु सध्याच्या सरकारने याबाबत पक्षपातीपणाची भूमिका घेतली आहे व या मतदारसंघातील जनतेवर अन्याय करण्याचा प्रयत्न केला आहे .यामध्येही आपण लक्ष घालून हा प्रश्‍न निकाली निघण्यासाठी संबंधितांना आदेश देऊन ही योजना पूर्ण करावी व करोडो श्रद्धाळू भाविकांसाठी या रेल्वेचा उपयोग व्हावा यासाठी निधीची तरतूद केंद्रसरकारने करावी, अशी भूमिका यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केली.


Back to top button
Don`t copy text!