मराठा आरक्षणाबाबत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर राज्यपालांच्या भेटीला; विशेष लक्ष घालण्याची केली मागणी


 

राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्यासमवेत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

स्थैर्य, फलटण, दि.३ : सध्या राज्यामध्ये मराठा आरक्षणावरून रान पेटलेले असताना माढा लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाबाबत आपण लक्ष घालावे व मराठा समाज बांधवांना आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी आग्रहाची मागणी केली आहे.

खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनमध्ये राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेतली. यावेळी, मराठा समाजातील युवकांचे बरेच प्रश्‍न अतिशय जटिल बनले असून मराठा समाजातील युवकांना नोकरी मिळवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आरक्षणाअभावी त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण अत्यंत महत्त्वाचे असून याबाबत आपण स्वतः पाठपुरावा करून मराठा आरक्षण मिळण्याबाबत प्रयत्न करावेत. हे आरक्षण मिळवून देताना कोणत्याही समाजाचे आरक्षण काढून न घेता मराठा समाजाला स्वतंत्ररीत्या आरक्षण मिळावे. ज्या इतर समाजातील नेतेमंडळी मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत आग्रही आहेत, त्यांचाही पाठिंबा घेऊन हा आरक्षणाचा प्रश्‍न सोडवावा, अशी विनंती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राज्यपाल कोशारी यांना केली.

सद्यस्थितीत राज्यामध्ये असणार्‍या महाविकास आघाडीच्या सरकारच्या कारभारामुळे शेतकर्‍यांसह व सर्वसामान्य जनतेचे अतिशय हाल होत आहेत. राज्यात वाढीव वीज बिलाचा प्रश्‍न जटिल असून ही वाढीव वीज बिले माफ करण्याबाबत आपण राज्यसरकारला योग्य ती शिफारस करावी अशीही मागणीही यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याकडे केली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!