स्थैर्य, लखनौ, दि.२०: अयोध्येच्या
धन्नीपूर गावात मशीद उभारण्यासाठी देण्यात आलेल्या पाच एकर जागेवर मशीद आणि
हॉस्पिटल उभारले जाणार आहे. त्याचे डिझाइन जारी करण्यात आले. या कामाला
पुढील वर्षी १५ ऑगस्ट रोजी सुरुवात होण्याची शक्यता आहे.
मशीद उभारण्यासाठी सुन्नी वक्फ बोर्डाने
इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशनची स्थापना केली आहे. शनिवारी येथे पत्रकार
परिषदेत फाउंडेशनचे अध्यक्ष जुफर फारुखी आणि सचिव अतहर हुसैन व अन्य
सदस्यांनी मशिदीचे डिझाइन सार्वजनिक केले.
भूमिपूजन कार्यक्रमास उत्तर प्रदेशचे
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रण देणार का, असा सवाल केला असता
हुसैन म्हणाले की, आमच्या परंपरेनुसार मशिदीच्या भूमिपूजनासाठी मोठा
कार्यक्रम आयोजित केला जात नाही. मशिदीचे नाव राजा किंवा नवाबांच्या नावाने
नसेल. मी अशी सूचना केली आहे की, मशिदीचे नाव धन्नीपूर मशीद असे ठेवावे,
असेही ते म्हणाले.
या मशिदीचे डिझाइन जामिया मिल्लिया
इस्लामियाचे आर्किटेक्चर विभागाचे प्रोफेसर एस. एम. अख्तर यांनी तयार केले
आहे. ऑनलाइन मीटिंगच्या माध्यमातून अख्तर यांनी पत्रकारांना सांगितले की,
मशिदीशिवाय २०० बेडचे हॉस्पिटल, सार्वजनिक भोजनालय आणि आधुनिक ग्रंथालय
उभारण्याची योजना आहे. मशिदीचे डिझाइन आधुनिक आहे. मशीद कोणत्याही
घुमटाशिवाय अंडाकार असेल. दोन मजली मशिदीत मीनारही नसेल. येथे सोलार पॉवर
असेल आणि जवळपास दोन हजार लोक एकत्र नमाज पढू शकतील.