दैनिक स्थैर्य | दि. २१ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
फलटण येथील श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या व कृषि महाविद्यालयामध्ये वाचन प्रेरणा दिवसानिमीत्त व्याख्यान व पुस्तकाच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या पुस्तक प्रदर्शनाला महाविद्यालयातील ५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी भेट दिली.
कार्यक्रमाची सुरूवात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सागर तरटे यांनी केली. वाचन आणि लेखन यांची आवड असणारे माजी राष्ट्रपती डॉ. ए .पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती (१५ ऑक्टोबर ) हा दिवस संपूर्ण भारतात वाचन प्रेरणा दिवस साजरा केला जातो. त्या अनुषंगाने आजच्या विद्यार्थ्यांमध्ये वाचन करण्याचे महत्त्व, वाचन संस्कृतिची जोपासना आणि वाचन हा एक छंद म्हणून जर आत्मसात केला तर नक्कीच विद्यार्थी व्यक्तिमत्त्वामध्ये आत्मविश्वास आणि वैचारिक प्रगल्भता निर्माण होईल म्हणून महाविद्यालयातील ग्रंथालय विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या समन्वयाने वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी पुस्तक प्रदर्शनाचे आयोजित करण्यात आले होते. पुस्तक प्रदर्शनाला महाविद्यालयातील ५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी भेट दिली.
वाचन प्रेरणा दिनानिमित्त ‘वाचनाचे विद्यार्थी जीवनातील महत्त्व’ या विषयावर श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयातील मृदा विभागाचे प्रा. आप्पासाहेब शिंदे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यांनी ‘वाचन आणि मानवी जीवन’ याचा काय संबंध आहे, हे विशद केले. वाचन हे सामजिक व राजकीय क्षेत्र यामधील दुवा आहे. उत्कृष्ट समाज घडवायचा असेल तर वाचन खूप गरजेचे आहे. तसेच समाजात चांगले नेतृत्व निर्माण करण्यासाठी युवकांनी खूप वाचन केले पाहिजे. याप्रसंगी त्यांनी ‘डॉ. अब्दुल कलाम यांचे वाचनाबद्दल विचार’ या विषयावर मार्गदर्शन केले.
कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण यांनी वाचन प्रेरणा दिवसाचे महत्त्व व वाचन मानवी जीवन कसे समृद्ध करते. तसेच विद्यार्थी जीवनातील अतिरीक्त वाचनाचे महत्व या विषयांवर विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी साक्षी जाधवने केले. ग्रंथपाल श्री. प्रकाश तरटे यांनी आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमाला कार्यक्रम अधिकारी प्रा. महेश बिचुकले, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.