दैनिक स्थैर्य | दि. २ जून २०२४ | पुणे |
मान्सून नुकताच केरळमध्ये दाखल झाला आहे. त्यानंतर राज्यात मान्सूनची प्रतीक्षा आहे. आता येत्या ७ ते ८ जूनला मान्सून तळकोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज आहे. तसेच पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली होती. अनेक जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता. मात्र, आता राज्यात पावसाचा अंदाज असल्याने काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. त्यातच येत्या २ ते ३ दिवसात मान्सून कर्नाटकात पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तर ७ ते ८ जूनपर्यंत मान्सून राज्याच्या प्रवेशद्वार असलेल्या सिंधुदुर्गात दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
तसेच जूनच्या सुरुवातीला मान्सूनपुर्व पाऊस राज्यात सक्रिय होणार आहे. त्याप्रमाणे आज २ जून रोजी दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, धाराशिव, लातूर, नांदेडमध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. तर ३, ४ आणि ५ जून रोजी मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, बीड, जालन्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ६, ७ आणि ८ जून रोजी अरबी समुद्रात देखील एक प्रणाली सक्रिय होणार आहे. सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, ठाणे, मुंबई, पालघरच्या काही भागात तीन दिवस ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. २ जून ते ८ जून अनेक भागात पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे.