महाबळेश्वरातील झाडाणी जमीन प्रकरण : गुजरातच्या ‘जीएसटी’ आयुक्तांना नोटीस

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २ जून २०२४ | सातारा |
झाडाणी (ता. महाबळेश्वर) येथील तब्बल ६२० एकर जमीन बळकावल्याच्या आरोपाप्रकरणी अप्पर जिल्हाधिकार्‍यांनी गुजरातच्या जीएसटी आयुक्तांना नोटीस बजावली आहे.

सातार्‍याचे अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी, अनिल वसावे, पीयूष बोगीरवार यांना नोटीस बजावली आहे. याप्रकरणी ११ जून रोजी सकाळी ११ वाजता अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र शेतजमीन अधिनियम १९६१ नुसार निश्चित केलेल्या जमीन धारणेच्या कमाल मर्यादापेक्षा जास्त जमीन धारण केल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने ही नोटीस बजावण्यात आली आहे.

या दिवशी उपस्थित राहून कागदपत्रे सादर न केल्यास आपणास काही एक सांगावयाचे नाही, असे गृहित धरून जास्तीची जमीन सरकार जमा करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही नोटीसद्वारे देण्यात आला आहे.

झाडाणी येथील ६२० एकर जमीन जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी आणि त्यांच्या नातेवाईकांनी बळकावल्याचा आरोप आहे. या जागेवर अनधिकृत रिसॉर्ट बांधल्याचेही माहिती अधिकारातून समोर आले आहे. याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी सह्याद्री वाचवा मोहीमेअंतर्गत जिल्हाधिकार्‍यांसह विविध ठिकाणी निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली होती. मोरे यांनी वळवी यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडेही तक्रार केली होती. या तक्रारीनंतर जिल्हाधिकार्‍यांनी चौकशी समिती नेमून वाईच्या उपविभागीय अधिकार्‍यांना अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पालकमंत्री शंभूराज देसाई, आ. मकरंद पाटील यांनीही जिल्हाधिकार्‍यांना याप्रकरणात सूचना दिल्या होत्या. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दरे गावी आल्यानंतर याप्रकरणात जिल्हाधिकार्‍यांना दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.


Back to top button
Don`t copy text!