‘मान्सून’ हाच भारतीय एकात्मता साधणारा महत्त्वाचा दुवा – सुनील तांबे

श्रीमंत मालोजीराजे स्मृती महोत्सवात ज्येष्ठ पत्रकार तांबे यांचे व्याख्यान संपन्न


दैनिक स्थैर्य | दि. २१ मे २०२४ | फलटण |
केरळमध्ये सर्वात आधी मान्सून येतो. त्यामुळे त्या ठिकाणच्या पिकांची कापणी अगोदर होते, तिथे ओनम साजरा केला जातो, तर आपल्याकडे दिवाळी साजरी केली जाते. तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश येथे ‘उघडी’ तर पंजाबमध्ये ‘बैसाखी’, राजस्थानात ‘गणगौर’ आसाममध्ये ‘बिहू’ केरळमध्ये ‘भिशू’ हे सण या सुमारास साजरे होतात. हे शेती व्यवसायाची संबंधित सण साजरे केले जातात. शेती व्यवसाय करणार्‍यांची विशिष्ट जात किंवा धर्म नसतो. त्यामुळे ‘मान्सून’ हाच भारतीय एकात्मता साधणारा महत्त्वाचा दुवा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे यांनी केले.

श्रीमंत मालोजीराजे स्मृती महोत्सवात सहाव्या दिवशी मुंबई येथील ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे यांचे ‘मॉन्सून आणि भारताची एकात्मता’ या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. यावेळी त्यांनी आपल्या विश्लेषणामध्ये नैऋत्य मान्सून म्हणजे खरीप हंगाम व या हंगामात लावलेल्या पिकांची सुगी रब्बी हंगामाच्या आरंभी होते, तर रब्बी हंगामाच्या पिकांची काढणी चैत्रात होते, त्यामुळे दिवाळी आणि गुढीपाडवा हे दोन्ही नववर्षाचे सण भारतात साजरे केले जातात, असे सांगितले.

तांबे पुढे म्हणाले की, शेतमालाच्या किमती शेती हंगामामध्ये सातत्याने कमी होतात, कारण मान्सूनचे आगमन हे वेगवेगळ्या भूप्रदेशात थोड्याफार फरकाने वेगवेगळ्या वेळी होते. त्यामुळे सातत्याने बाजारपेठेत शेतमालाची आवक वाढते व शेतमालाचे भाव पडतात, असे त्यांनी नमूद केले.

प्राचीन काळापासून भारतीय उपखंडातील आर्थिक जीवन शेती, पशूपालन, मच्छीमारी, कारखानदारी, व्यापार मोसमी वार्‍यांनी घडवला आहे, तर उत्पादन, वितरण आणि उपभोग यांच्या विकेंद्रीत व्यवस्थांमुळे भारतीय उपखंडातील सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जीवनाची जडणघडण झाली आहे. भारताच्या पर्यावरणात आणि संस्कृतीत मोसमी वार्‍यांचा वाटा आणि भूमिका महत्त्वाची असल्याचे तांबे यांनी यावेळी सांगितले.

नैसर्गिकदृष्ट्या भारतात असणारी विविधता हीच एकात्मता टिकून ठेवणारी आहे. कारण खरीप हंगाम व रब्बी हंगाम यामध्ये पर्जन्यमान प्रदेशानुसार वेगवेगळे असते. शेतकरी हिंदू असेल, मुस्लिम असेल, बौद्ध असेल, जैन असेल, ख्रिश्चन असेल तरी त्याचं खरीप व रब्बी हंगामाची नातं जोडलेलं असतं. कच्छपासून नागालँड आणि काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंतचे सर्व लोक एकमेकांशी मान्सूनने जोडलेले आहेत. राष्ट्र म्हणून आपली बांधीलकी ना धर्माला असते, ना पंथाला, वा भाषेला. दोन भारतीयांचे एकमत, एकमेकांशी असलेलं नातं मान्सूनचं आणि सण-उत्सवांचं असतं, असेही तांबे म्हणाले.

भारत हा विविध धर्मीयांचा देश आहे. प्रत्येक धर्माची चालरीत व परंपरा वेगवेगळ्या आहेत. उपासना पद्धती वेगळ्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाचा व्यवसायही वेगवेगळा असलेला दिसून येतो. मात्र, हे सर्वजण एकमेकांवर अवलंबून आणि त्यामुळेच परस्परावलंबनामुळे भारतीय एकात्मता टिकून राहते. पर्जन्यमान कमी असणारे प्रदेश आणि पर्जन्यमान जास्त असणारे प्रदेश, हे एकमेकांवर अवलंबून असतात. प्रत्येक समूहाला आपापल्या जीवनचक्राप्रमाणे उपजीविकेनुसार दैवत मानण्याची, त्यांची उपासना करण्याची मुभा आहे. हे भारतीय संस्कृतीचं एक वेगळेपण आहे. त्यांच्यात परस्परात आपुलकी निर्माण करण्याची क्षमता आहे. मोसमी वार्‍यांमुळेच भारतामध्ये सकल भागामध्ये सिटी संस्कृती विकसित झाली. विविध धान्य-मसाल्याचे पदार्थ व अलीकडे व्यापारी पिकांचे उत्पादन होत असते. त्या त्या प्रदेशांमध्ये आवश्यकतेनुसार पशूंमध्ये सुद्धा विविधता दिसून येते. केवळ भारताची एकात्मताच नव्हे तर विविध देशांशी असणारे संबंधही मान्सूनच्या उपलब्धतेमुळे असणारी भारतीय शेतीची विविधता असल्यानेच व्यापारसही चालना मिळते, असे तांबे यांनी सांगितले.

मुस्लिमबहुल प्रांतात मान्सून पुरेसा नसतो. त्यामुळे तेथील लोक व्यापारावर अवलंबून असतात, असेही तांबे यांनी सांगून भारतामध्ये कधीही धर्माच्या आधारे राज्यांच्या सीमारेषा आखल्या नाहीत. सर्व धर्मांना स्थान आहे. त्यांच्या मते ढोबळमानाने सर्व राज्यकर्त्यांचं धोरण सर्वधर्मसमभावाचंच राहिलेला आहे. मुस्लीम राज्यांनीही हिंदूंच्या मंदिरांना वतनं दिली. त्यामुळेच हिंदू-मुस्लिम असं कधीही अंतर पूर्वी नव्हतं. विविध धर्म, भाषा असलेले लोक एक अर्थव्यवस्था यशस्वीपणे चालू शकतात, ही बाब युरोपियन यांच्या कल्पनेतही नव्हती. मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा या स्वातंत्र्यलढ्यात नसलेल्या दोन राजकीय पक्षांनी धर्मावर आधारित राष्ट्र, राज्य संकल्पनेचा पाठपुरावा केला होता. भारतीय राज्यघटनेने वंश, धर्म, भाषा, प्रांत यांच्या संबंधात लवचिक आणि व्यवहार्य भूमिका घेतली. म्हणून फुटीर राष्ट्रवादाचा, उपराष्ट्रवादाचा मुकाबला स्वतंत्र भारताला भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत करता आला. त्यामुळे स्वतंत्र भारताचे ऐक्य अभेद्य राहील, असे तांबे यांनी सांगितले.

या व्याख्यानाच्या अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी सुनील तांबे यांच्या व्याख्यानातील संदर्भ यांचा परामर्श घेतला व हे व्याख्यान कसे संशोधनपर आहे व राष्ट्रीय एकात्मतेच्या नव्या अदृश पैलूंकडे लक्ष वेधणारे आहे, हे सांगितले.

राष्ट्रीय एकात्मतेमध्ये फलटण संस्थानचा सहभाग कसा राहिला, हे सांगताना जेव्हा भारताच्या स्वातंत्र्यामध्ये विविध संस्थाने विलीन करावयाची होती, तेव्हा फलटण संस्थांचे अधिपती श्रीमंत मालोजीराजे यांनी तात्काळ लोकशाहीमूल्य ओळखून आपले संस्थान तिजोरीसह सरकारमध्ये विलीन केले. असे हे श्रीमंत मालोजीराजे हे दृष्टी व लोकशाहीमूल्य जोपासणारे होते. सरदार वल्लभाई पटेल यांच्या सर्व संस्थानांच्या विलीनीकरण करण्याच्या कार्याला त्यांनी योग्य प्रतिसाद देऊन राष्ट्रीय एकात्मतेत आपली भूमिका बजावलेली आहे, असे प्राचार्य कदम यांनी सांगितले.

आरंभी प्रमुख वक्ते सुनील तांबे, अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर पी. एच. कदम, प्रतिष्ठानचे सदस्य घोरपडे, प्राचार्य अरविंद निकम, प्राचार्य रुपनवर, प्रा. नीलम देशमुख यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठानचे सचिव प्राचार्य विश्वासराव देशमुख, ज्येष्ठ पत्रकार अरविंद भाई मेहता, प्राचार्य गंगावणे सर व निवृत्त शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होत्या.

निवेदन प्रतिष्ठानचे सदस्य डॉ. एस. जी. दीक्षित यांनी केले व सूमधुर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.


Back to top button
Don`t copy text!