दैनिक स्थैर्य | दि. २४ मार्च २०२४ | फलटण |
काही दिवसांपासून फलटण शहरात मोबाईल फोन चोरीच्या घटना घडत आहेत. अनेक लोक याबाबतची तक्रार करीत नाहीत, याची माहिती काही पत्रकार व नागरिकांनी पोलीस ठाण्यात दिली होती.
या पार्श्वभूमीवर २१ मार्च २०२४ रोजी डेक्कन चौक, फलटण येथे श्री. युसूफ मन्सूर महात (वय ५२, रा. कोळकी, फलटण) हे चालत जात असताना तीन अनोळखी आरोपींनी दुचाकीवरून येऊन त्यांचा मोबाईल फोन हिसकावून घेऊन गेले. याची तक्रार फलटण शहर पोलीस ठाण्यात देण्यात येऊन अनोळखी चोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सपोनि नितीन शिंदे यांच्याकडे देण्यात आला.
वरील माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी फलटण शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे सपोनि नितीन शिंदे आणि त्यांच्या पथकास मोबाईल फोन चोरीच्या घटनांबाबत आढावा घेऊन, चोरांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.
या माहितीच्या आधारे फलटण शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण कक्षाच्या पथकाने केलेल्या कारवाईत आरोपी निलेश अनिल जाधव (वय २१), निखिल तुकाराम गदाई (वय १९), मंगेश संजय गंगावणे (वय २१, तिघेही रा. सोमवार पेठ, फलटण) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
या आरोपींकडून अंदाजे एकूण ३,०२,५००/- रूपये किमतीचे चोरलेले १२ मोबाईल फोन आणि सदर चोरांच्या टोळीने गुन्हा करताना वापरलेली दुचाकी अॅक्टीव्हा हे वाहन जप्त केले आहे.
मोबाईल फोन चोरीस गेल्यास तक्रार द्यावी !
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, मोबाईल फोन चोरीस गेल्यास किंवा हरविल्यास त्याबाबत नजीकच्या पोलीस ठाण्यात तात्काळ माहिती द्यावी. अशा मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी दूरसंचार विभागाने वेबसाईट सुरू केली आहे. तसेच चोरीचे मोबाईल विकत घेऊ नये, असेही पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे.