बहिणाबाईचा “खऱ्या संसारतला पाहिलेला तवा “‘ आणि मला बसलेला चटका…!!

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मराठी साहित्यातली अमृतवेल म्हणजे बहिणाबाई चौधरी… माझी बदली फेब्रुवारीच्या मध्यात जळगावला झाल्याचे कळले… त्याक्षणी मला ‘ अरे संसार संसार ‘ हे आजरामर काव्य लिहणाऱ्या बहिणाबाईची कविता आठवली.. आणि लातूर ते जळगाव हे साडेचारशे किलोमीटरचे अंतर गळून पडले… मी पाहिलेल्या चुलीवरच्या पिढ्या आठवल्या, तेच आठरा विश्व दारिद्र्य आठवलं…त्याच जात्यावरच्या ओव्या ऐकत मांडीवर साखर झोप घेतलेलं बालपण आठवलं… आजीचं, आईच घरातलं बाईपण सांभाळून शेतातलं खपण पाहिलेलं माझं बालपण मला बहिणाबाईच्या काळाची कल्पना करायला सुलभ झालं… हे सर्वं सांगण्याचं प्रयोजन मित्रहो हेच आहे, आज कार्यालयीन कामकाज संपवून संध्याकाळी मित्रवर्य हर्षल पाटील Harshal Patil याच्या सोबत आज जुन्या जळगाव शहरात चौधरी वाड्यात… चक्क बहिणाबाईला भेटायला गेलो ( त्यांच्या मृत्यूला आज जवळपास 75 वर्षे होत आहेत). पण आजही त्यांच्या स्पर्श असलेल्या वस्तू बघून मला त्या काळातल्या बहिणाबाई कल्पनेच्यापटात पाहता आल्या … त्यांच्या नातसून पदमाबाई चौधरी यांनी बहिणाबाईला त्यांच्या वस्तू रूपात जीवंत ठेवलंय… त्यांच्या पंतूसून स्मिताताई चौधरी आमच्या सोबत होत्या.. आणि त्या एक ना एक वस्तूच्या ऐतिहासिक दस्ताऐवजा मागच्या कथा सांगत होत्या, त्यावेळी आतून गलबलून येतं होतं… त्यांनी तवा दाखविला त्यावेळी लख्ख ” अरे संसार संसार, नही रडनं कुढनं येडया, गयांतला हार म्हणूं नको रे लोढणं…. ” या ओळी माझ्या आजी, आईच्या ओठातलं जात्यावरचं गाणं आठवलं…बहिणाबाई औपचारिक शिक्षण शिकल्या नव्हत्या पण त्या ज्या असोद्याच्या घरात उखाजी महाजनांच्या घरी जन्मल्या होत्या.. त्यामुळे व्यवहार शिक्षण त्यांच्या डी. एन. ए. मध्येच होते. त्यामुळे वयाच्या 13 व्या वर्षी जळगावच्या नथुजी चौधरीशी लग्न आणि वयाच्या तिशीत वैधव्य.. पदरात तीन लेकरं त्यातल्या ओंकारला प्लेगच्या साथिमध्ये आलेल अपंगत्व…हे सगळं झेलत स्वतःच्या हिंमत्तीने शेती करत.. सोपानदेव चौधरी यांना शिक्षण देताना आपल्या बहिणीच्या लेकरालाही ( सखाराम पाटील ) आपल्याकडे ठेवून पंखात बळ भरण.. आणि या सगळ्या व्यापात आपली काव्य प्रतिभा उजळवून( न लिहता वाचता येत नसतानाही ) त्या गेयरूपात सादर करणं.. आणि हे सगळं बहिणीच्या मुलाने म्हणजे सखाराम पाटील यांनी मोडीत शब्दबद्द करणं हे सगळं केवळ अलौकिक… जळगावच्या भोवताल काव्याच्या कवेत घेताना त्या मुक्ताईनगरला समाधिस्त झालेल्या मुक्ताई, चांगदेव आणि ज्ञानदेवाचीही भव्यता अधोरेखित करतात…. घराच्या शेजारी असलेला छाप खाण्यातल्या कागदावर उमटलेले अक्षर पाहुन कोरा कागद शहाणा झाल्याची उपमा… हे सगळं माझ्या सामान्य माणसाच्या आकलन क्षमतेच्या पुढचं आहे… शेतात लावलेलं एक झाड.. जे उन्हाळ्यात पान झडणारं झाडं कशाला लावलं हे शेजारीन म्हणते तेंव्हा बहिणाबाई म्हणते ” उन्हाळ्यात सगळीकडे बोडक्या झालेल्या उजाड रानातही फुलणारी फुलं जगण्याचा आनंद सांगून जातात” हे तत्वज्ञान सांगणारी बहिणाबाईची कुळी मला मोठी भाष्यकार वाटते.. सोपानदेव चौधरी त्या काळात आंतरजातीय विवाह करतात ( त्या काळी मुंबईचे शिल्पकार भाऊ दाजी लाड यांच्या नातीशी विवाह केला होता म्हणे,हे ऐकीव माहिती आहे. मला लेखी पुरावा सापडला नाही… चुकीचं असेल तर क्षमस्व) … तेही स्विकारण्याचं धाडस ही आई दाखवते… अशी ही बहिणाबाई किती धीराची आहे

‘ अरे रडता रडता,डोळे भरले भरले, आसू सरले सरले, आता हुंदके उरले, आसू सरले सरले, माझा मलेच इसावा, असा आसवा बिगर, रडू नको माझ्या जीवा ‘ हे या ओळीवरून लक्षात येते.

बहिणाबाईच्या चौधरी वाड्यातील घराचा आकार पंधरा बाय दहा असेल… तिथे बहिणाबाईचा संसार फुलला.. आणि मराठी साहित्याला अमर काव्य या घरातून मिळाले… आज हे सगळं मी सपत्नीक पाहिलं… आणि सर्वात महत्वाचे म्हणजे खान्देश कोष मित्रवर्य हर्षल पाटील सोबत असल्यामुळे.. आजचा दिवस आयुष्यातला एक संस्मरणीय दिवस ठरला… बहिणाबाईंच्या प्रतिभेच्या चरणी नतमस्तक होऊन आजचा दिवस संपला…!!

– युवराज पाटील,

जिल्हा माहिती अधिकारी, जळगाव

(सर्वं फोटो काढलेत माझा मित्र हर्षल पाटील यांनी… आजच ज्याच्या एक पात्री प्रयोगावर एका मोठया् दैनिकात पानभर लिहून आलं आहे.. असा प्रतिभावंत मित्र फोटोत नाही हे नंतर कळलं… आणि मलाच माझा खेद वाटला )


Back to top button
Don`t copy text!