आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, दीपक चव्हाण व संजीवराजे नाईक निंबाळकर यांची निर्दोष सुटका


स्थैर्य , वाई , दि .२६: पुणे बंगळुर महामार्गावर जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचा भंग करून अनधिकृत रीत्या शेतकरी आंदोलन व मेळावा आयोजित करून जाहीर सभा घेतल्या प्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यातून आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, दीपक चव्हाण व संजीवराजे नाईक निंबाळकर यांची वाई न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
जून २०१७ साली पुणे-बंगळूर महामार्गावर पाचवड (ता वाई )येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेश झुगारून आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, दीपक चव्हाण, संजीवराजे नाईक निंबाळकर आदींनी अडीचशे ते तीनशे लोकांचा जमाव अनधिकृतरित्या जमवून महामार्गावर रस्ता रोको करत जाहीर सभा घेतली. म्हणून पोलीस नाईक धनाजी तानाजी कदम यांनी भुईंज पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या अनुषंगाने वाई न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता.याप्रकरणी न्या एम एन गिरवलकर यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. ऍड रवींद्र भोसले व संजय खडसरे यांनी आमदार शिंदे,पाटील,चव्हाण व नाईक निंबाळकर यांच्या वतीने तर ऍड मिलिंद पांडकर ,स्वाती जाधव यांनी सरकार पक्षाच्या वतीने काम पाहिले.याकामी न्यायालयात सहा साक्षीदार तपासण्यात आले.आज अंतिम सुनावणी दरम्यान सर्वांची निर्दोष सुटका करण्यात आली. न्यायालयात सुनावणीसाठी आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, दीपक चव्हाण व संजीवराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते.सर्व आमदार न्यायालयात आल्याने कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती.

Back to top button
Don`t copy text!