खानापूर आटपाडी चा,ढान्या वाघ १९५७ चा आमदार, आंबेडकरी चळवळीचा शिलेदार, आमदार पी. टी.मधाळे !

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०१ मे २०२३ । आटपाडी । विश्वरत्न,परमपुज्य, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निकटवर्तीय  सहकारी, खंदे शिलेदार, दख्खनचा वाघ व पश्चिम महाराष्ट्रातील दलितांचे  अग्रणी नेते आमदार पी.टी.मधाळे यांच्या कार्य व कृत्वावर छोटासा दिष्टीक्षेप-

इंग्रज राजवटीच्या कालखंडातील दक्षिण सातारा जिल्हयातील (सांगली) वाळवा तालुक्यातील वारणा नदी जवळील “शिगांव” येथे पूर्व श्रमीच्या महार समाज्यातील तायाप्पा मलू मधाळे व त्यांची पत्नी यलाम्मा  यांच्या पोटी पिराजी यांचा जन्म १० एप्रिल १८९७ रोजी झाला. त्यांचे बालपण वारणा खोऱ्यातील शिगांव येथे खेळणे बागडण्यात गेले. घरच्या गरीब परिस्थीतून व जातीयतेचे चटके सोसत कसेबसे शिक्षण घेत होते. शिक्षणात अंत्यत हुशार असलमुळे तायाप्पा व यलाम्मा या उभयतांनी गांवकीची कामे करून पिराजीस शिकवीत होते. पिराजी हे सातवीत असताना अचानकपणे एकापाठोपाठ आई-वडील वारलेमुळे पिराजीच्या डोक्यावरचे आई- वडिलांचे छत्र हरपले. गांवी कोणताही आधार नसल्याने पिराजी यांच्या आत्याबाई  अनुबाई रामचंद्र कांबळे कोल्हापूर यांचेकडे राहणेसाठी व पुढील शिक्षणासाठी गेले. त्यावेळीस पिराजी यांनी दहावी पर्यन्तचे शिक्षण कोल्हापुरात पूर्ण केले होते.
राजर्षी शाहू महाराज यांच्या संस्थानात फौजदार म्हणून पिराजी यांची नियुक्ती झाली. राजर्षी शाहू महाराज सामाजिक समतेचे युगपुरुष असून आरक्षणाचे जनक होते. सदरच्या वेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे छत्रपती शाहू महाराजाकडे कोल्हापूर-पन्हाळा येथे येत असत. त्यावेळी पिराजी मधाळे यांनी डॉ. बाबासाहेबाना प्रथम समक्ष पाहिले होते. त्या दरम्यान डॉ. बाबासाहेब हे पन्हाळा येथे सन १९२५ साली आले असताना पिराजी यांना भेटणेचा व बोलणेचा संबध आलेला होता. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकराचे दैप्तियमानरुप व भारदस्त व्यक्तिमत्व पाहून पिराजी भारावून गेले होते. बाबाना पाहताच त्यांच्या अंगात नवीन उर्मी आलेची जानीव झाली. कोल्हापूर  येथे डॉ. बाबासाहेब आले नंतर त्यांच्या सहवासात राहात असत. त्यांना कधी-कधी घरचा जेवणाचा डबा घेऊन जात असत, त्यावेळी डॉ. आंबेडकर  आवडीने डब्यातील जेवण खात असत. मधाळे यांचेवर डॉ. बाबासाहेबाच्या विचाराचा पगडा बसल्याने ते सतत त्यांचे बरोबर राहात असत. राजर्षी शाहू महाराजा कडील नोकरी सांभाळून ते डॉ. बाबासाहेबांच्या कडे ये- जा करीत असत.
एके दिवशी मधाळे वेळेवर कामावर गेले नसल्यामुळे करवीर संस्थानचे लिपीक सरदार यांनी त्यांना जातीय द्वेषापोटी कामावर हजर करून घेतले नाही, त्याच वेळी मधाळे आबानी स्वाभिमानाने नोकरीचा राजीनामा दिला आणि डॉ.बाबासाहेबाच्या बरोबर चळवळीत पूर्णवेळ सहभागी झाले होते.
त्यानंतर डॉ. बाबासाहेब, मधाळे आबांना म्हणाले, तुमच्या भागात व जिल्हयात सभा, परिषदा भरवा. सदर सभेस येतो आहे असे सांगीतल्यानंतर  मधाळे आबानी सांगली,सातारा,कोल्हापूर या तीन जिल्हयातील अस्पृश्य -दलित कार्यकर्त्यांची बैठक घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या सभेचे नियोजन करणेत आले,आणि सदर सभेचे ठिकाण सर्वानुमते अंकलखोप ता.पलूस जि.सांगली हे गाव निवडणेत आले.या गांवचे दलित कार्यकर्ते लांडगे, कोल्हे,कांबळे,कु-हाडे,बिरनाळे या लोकावर सभेची जबाबदारी सोपविली होती. गावोगांवी सभेबाबतचा प्रचार करून दलित युवक परिषद स्थापन केली होती.त्याच बरोबर समता समिती (भिम सैनिक)ची सुद्धा स्थापना केलेली होती. मधाळे आबांनी सांगली-सातारा-कोल्हापूर या तीन जिल्यात सभेच्या प्रचारासाठी रात्र-दिवस झटत होते.सन १९३९ साली अंकलखोप येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या सभेची तारीख निश्चित करणेत येऊन प्रत्येक दलित कार्यकर्ता तन-मन-धनाने सभेसाठी प्रयन्त करीत होते.   सन १९३९ च्या अंकल  खोप येथील सभेत प्रचंड जनसमुदाय उपस्थितीत होता.गावोगांवच्या भागातील लोक या परिषदेस स्वच्छ कपडे घालून पायी चालत आले होते. समता समितीच्या तरूण भिम सैनिका मार्फत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देणेसाठी काठ्या, भाले,कुऱ्हाडी यांची कमान करून सभेच्या ठिकाणी नेहून मानवंदना दिली होती. या सभेतील प्रचंड जनसमुदाय पाहून डॉ.बाबासाहेब आश्यर्य चकित झाले होते. या परिषदेचे स्वागत- अध्यक्ष म्हणून मधाळे आबा होते. डॉ. बाबासाहेबांनी प्रचंड समुदायास उद्देशून म्हणाले,आज मी पी.टी. मधाळे यांना “दख्खनचा वाघ ” म्हणून उपाधी बहाल करतोय सर्वांनी जय घोष केला.त्यानंतर सांगली,सातारा,कोल्हापूर भागात पी.टी.मधाळे यांना “दख्खनचा वाघ” म्हणून गौरविण्यात येऊ लागले होते. अस्पृश्याच्या मुक्तीचा मार्ग काय ? या डॉ.आंबेडकर यांच्या भाषणाचा जनमाणसावर फरक पडत होता. सन १९२७ साली महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रहात ते कार्यकर्त्यासह सामील होते.तसेच नाशिक येथील काळाराम मंदिर सत्याग्रहात भाग घेतलेला होता.
सन १९४०-४१ साली पी. टी. मधाळे  हे दक्षिण सातारा लोकल बोर्डवर निवडूण येऊन उपाध्यक्ष झाले. गावोगांवी दलित वस्त्यामध्ये पिण्याच्या पाण्याचे आड (विहिर) यांची सोय केली. लोकल बोर्डच्या नवीन प्राथमिक शाळा, दवाखाने इत्यादी प्राथमिक सुविधा निर्माण करण्यामध्ये पी.टी. मधाळे यांचा सिंहाचा वाटा होता, त्यावेळीस सातारा लोकल बोर्डवर सदस्य म्हणून विठ्ठल चंदनशिवे रा.लेंगरे ता.खानापूर जि.सांगली हे सुद्धा निवडूण आले होते. दक्षिण सातारा लोकल बोर्डवर राखीव जागेतून डॉ. आंबेडकराचे अनुयायी म्हणून बरेच जन निवडून आलेले होते. त्यामुळे पी.टी. मधाळे यांना लोकल बोर्डचे उपाध्यक्ष केलेले होते.
सन १९४२-४३ साली सांगली-सातारा जिल्यातील दलित कार्यकर्त्यांनी पी.टी. मधाळे यांची निवड जिल्हा अध्यक्ष म्हणून सर्वानुमते जाहीर करणेत आली. जिल्हयात पी.टी.मधाळे यांना “आबा”या नावाने संबोधण्यात येत असे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या शेड्युल काष्टस फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष झालेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सहमतीने अस्पृश्य-दलित-पीडीत,उपेक्षित,भटके-विमुक्त,शेतकरी, कामगार, कष्टकरी यांचा सामाजिक व आर्थिक विकास झालाच पाहिजे या सर्व उपेक्षित अशा तळागाळातील वर्गाला शासनकर्ता जमात बनविण्यासाठी शेड्युल कास्टस फेडरेशनच्या वतीने भूमिका मांडत असत. तसेच गांव गाड्यातील महार वतनामुळे महार समाज्यास गुलामगिरी करावी लागत आहे. यासाठी महार वतन रद्द झाले पाहिजे अशी सुद्धा भूमिका घेत असत.त्यासाठी सातत्याने आंदोलने, मोर्चे, परिषदा, मेळावा हे सतत पश्चिम महाराष्ट्रात सुरु असत.
साधारण १९४९-५० च्या दरम्यान शेड्युल काष्टस फेडरेशनच्या वतीने व पी. टी.मधाळे यांचे नेतृत्वाखाली किर्लोस्करवाडी ते सांगली असा पायी प्रचंड मोर्चा काडणेत आलेला होता. त्यामध्ये मागण्या करणेत आलेल्या होत्या कि, महारवतन खालसा करा, जातीय व्देषातून अस्पृश्य-दलितावरील होणारे अन्याय – अत्याचार थांबवा, अशा अनेक मागण्याचा मोर्चा होता. त्यामध्ये संपूर्णपणे दलित समाज एकवटला होता. एकजुटीची ताकद दिसून आलेली होती. जातीय व्देशाच्या भावनेवर मोर्चात प्रहार केलेमुळे  वातावरण सहानुभूतिपूर्वक होऊ लागले होते.मोर्चा यशस्वी झालेला होता. डॉ . बाबासाहेबाच्या आदेशाने निघणाऱ्या मोर्चात सामील होणे हे त्यावेळी  स्वाभिमानाचे प्रतिक समजणेत येत होते.
सन १९४९-५० सालच्या दरम्यान मिरज येथील पुर्वश्रमीच्या महार समाज्यातील कांबळे परिवाराच्या जमीनी धनदांडग्या लोकानी बळकविल्या  होत्या, त्या जमिनी डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी कोर्टातून सोडवून देण्यात आलेल्या आहेत. त्याबाबत- पी.टी. मधाळे व मा.वराळे यांनी मोलाचे सहकार्य केलेले होते.
परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या बरोबर मा. दादासाहेब गायकवाड नाशिक, मा.भैय्यासाहेब आंबेडकर मुंबई, मा.बापूसाहेब राजभोज दिल्ली, मा.शांताबाई दाणी नाशिक, पी.टी. मधाळे-दक्षिण सातारा, मा. सुबय्या , हैद्राबाद मा.एन. शिवराज मद्रास, मा.दादासाहेब शिर्के- कोल्हापूर, मा. भोळे-पुणे, मा.बै.बापूसाहेब कांबळे कोल्हापुर, मा. बी. सी. कांबळे मुंबई या मान्यवराचे भारतीय दलितांचे नेते म्हणून त्या काळी जाहिरातीवर फोटो छापनेत आलेले होते.
डॉ बाबासाहेब आंबेडकर आपल्या परिवारासह पन्हाळा (कोल्हापूर) येथे आले असताना डॉ. बाबासाहेबांनी पी.टी. मधाळे यांना बोलावून सांगीतले होते कि, भैय्यासाहेब व मिराताईचे लग्न झालेले आहे, त्यामुळे त्यांची हळद काडणे साठी तुझ्या गांवी (शिगांव) घेऊन जाऊन त्यांची हळद काडणेचा विधी करणेत यावा असे सांगीतल्यामुळे मधाळे आबानी भैय्यासाहेब व मिराताईना आपल्या गांवी शिगांव येथे घेऊन येऊन विधीवत हळद काढणेचा सभारंभ करणेत आला होता. त्यानंतर भैय्यासाहेब व मिराताईना सन्मानाने मुंबईस पाठविले होते.त्यामुळे डॉ.आंबेडकरांचा विश्वास पी. टी. मधाळे यांच्यावर होता .
साधारण सन १९५९-६०  साली पी. टी. मधाळे यांची मुलगी विजया ताई यांचा विवाह अंकली ता.मिरज तेथील सहदेव अर्जुन कोलप यांचे बरोबर अंकली येथे बौद्ध पद्धतीने साजरा करणेत आला होता. सदरचा बौद्ध पद्धतीचा विवाह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांनी स्वता : विवाह लावून दिलेला आहे. सदर बौद्ध पद्धतीचा विवाह सोहळ्यासाठी बहु संख्येने लोक अंकली येथे उपस्थीत होते.
सन १९५७ साली खानापूर-आटपाडी या (राखीव) विधानसभेच्या मतदार संघातून शेड्युल कास्टस फेडरेशनचे आधिकृत उमेदवार म्हणून पी.टी. मधाळे हे निवडणूकीस उभे होते.त्यावेळीस संयुक्त महाराष्ट्र समिती व शेतकरी कामगार पक्षाचा पाठींबा पी.टी. मधाळे यांना असलेमुळे ते आमदार म्हणून निवडून आले होते, विजयी झाले होते.त्यावेळी क्रांती अग्रणी जी.डी.(बापू) लाड हे तासगांव मतदार संघातून आमदार म्हणून विजयी झालेले होते. त्यामुळे कुंडल येथे क्रांतीअग्रणी जी.डी.(बापू)लाड व डॉ.आंबेडकरांच्या पक्षाचे उमेदवार म्हणून पी.टी. मधाळे यांची मिरवणूक काढणेत आलेली होती.
१४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे धम्म दिक्षा घेणे साठी पश्चिम महाराष्ट्रातील शेड्युल कास्टस फेडरेशनचे सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर येथील  बहुसंख्येने कार्यकर्ते नागपुर येथे १३ तारखेस हजर होवून १४ तारखेस सर्वांनी धम्म दिक्षा घेतलेली होती. त्यावेळी पी.टी. मधाळे  यांनी सांगली येथील जोशी टेलर्स (भूईगल्ली) यांचेकडून डॉ. बाबासाहेब आंबडेकरांच्या साठी नवीन  पांढरा शर्ट व कुर्ता शिलाई करून घेतला होता व माईसाहेबांना पांढरी साडी धम्म दिक्षा समारंभासाठी घेण्यात आली होती. नागपुरच्या दिक्षा भूमीच्या हॉल मध्ये डॉ. बाबासाहेब आंबडेकार  यांचे बरोबरचे पी. टी. मधाळे  यांचे फोटो आहेत.
राजर्षी शाहू महाराज व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विश्ववंदनीय महाविभूतीच्या विचारांची फार मोठी परमपंरा या देशाला  लाभली आहे. पी. टी. मधाळे यांना या दोन महामानवाचा सहवास अगदी जवळून लाभला होता. त्यामुळे मधाळे आबा हे सामाजिक समतेच्या न्यायाची लढाई अग्रहक्काने लढत होते. पुरोगामी विचारांची पताका पश्चिम महाराष्ट्रात फडकावित होते. त्यांना विधानसभेत जाण्याची संधी मिळाली, त्या संधीचे त्यांनी अक्षरक्षा सोने केले होते.  विधान सभेत मुलुख मैदान तोफे प्रमाणे गर्जत राहिले. महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, दलित, आदिवाशी, भटके-विमुक्त या समाज्याच्या प्रश्नासाठी आवाज उठवून संघर्ष करत होते. छत्रपती शाहू महाराज व डॉ. आंबेडकराच्या विचारांचे पाईक म्हणून त्यांचे व्यक्तिमत्व प्रकर्षपणे  दिसून येते.
शेडयुल कास्ट्स फे  आमदार म्हणून पी. टी. मधाळे विरोधी पक्षातून निवडून येवून सुद्धा त्यांचे सर्वांशी वैयक्तीक मित्रत्वाचे नाते ठेवले  होते. त्यामध्ये मा. यशवंतराव चव्हाण साहेब, मा. वसंतदादा पाटील, मा. राजाराम बापू पाटील , मा. बाळासाहेब देसाई , क्रांतीवीर नागनाथ आणा नायकवडी, क्रांती अग्रणी जी.डी. बापू लाड, देशभक्त  रन्ताप्पा  कुंभार, मा. आबासाहेब शिंदे (म्हैसाळ), मा.एन.आर.पाठक (मिरज) ,मा. गणपतराव कोळी,(तासगांव), मा.विठ्ठलराव दादा देशमुख(माहुलीकर)या प्रमुख मान्यवराबरोबर मित्रत्वाचे घट्ट नाते होते. त्यांच्याशी जिवाळ्याचे संबंध असलेमुळे सदरचे लोकनेते मंडळी पी.टी. मधाळे यांना मित्रत्वाच्या नात्याने  “ रावसाहेब” या नावाने बोलावित असत.

साधारण सन १९६० च्या दरम्यान मा.यशवंतराव चव्हाण साहेब  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणेसाठी कराड येथून  मुंबईकडे रेल्वेने जात असताना आमदार. पी. टी. मधाळे यांना समजले नंतर त्यांनी रेल्वे डब्याच्या  कोच मध्ये जाऊन त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्यानंतर मा.यशवंतराव चव्हाण साहेब म्हणाले कि, आज १४ एप्रिला डॉ.आंबेडकर साहेबांच्या जन्मदिनी तुम्ही मला शुभेच्छा दिल्या म्हणून त्यांनी आभार मानले. त्या वेळी पी.टी. मधाळे म्हणाले तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहात, महाराष्ट्रातील दलिताचे प्रश्न सोडविण्याचा आपण प्रयत्न करावा अशी विनंती केली होती, त्या वेळी पी.टी. मधाळे यांचे बरोबर कोल्हापूरचे आमदार दादासाहेब शिर्के व सातारचे  आमदार सावंत साहेब हे उपस्थितीत होते.
सन १९६१ साली सांगली कलेक्टर ऑफिसवर पी.टी. मधाळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढणेत आला होता.  या मोर्चाच्या मागण्या अशा होत्या, भूमिहिनाना जमिनी देण्यात याव्यात,दलितांची सामाजिक,आर्थिकव शैक्षणिक सुधारणा व प्रगतीसाठी शासनाने धोरण ठरवावे, दलितावरील अन्याय अत्याचार करणाऱ्याना शिक्षा व्हावी, दलितांना सरकारने सरंक्षण द्यावे, दलितांच्या स्वतंत्र वसाहती निर्माण कराव्यात दलितांना जगण्यासाठी पडीक जमीनी द्यावेत. या व इतर मागण्या केलेल्या होत्या,परंतु मोर्चास सरकारने बंदी घातली होती, परंतु मोर्चेवाल्यांनी सांगून सुद्धा त्यांनी ऐकले नाही मोर्चा निघाला होता, सदर मोर्चा वर पोलिसांनी लाठी हल्ला केला त्यामुळे अनेक कार्यकर्ते लाठी हल्यात जखमी, रक्तबंबाळ झाले होते. लाठी हल्याची वार्ता कळालेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. यशवंतराव चव्हाण साहेब सांगली येथील रेस्ट हाऊसवर आले असता त्यांनी पी. टी. मधाळे व मोर्चातील प्रमुख सहकाऱ्याना बोलावून त्यांनी दिलगीरी व्यक्त करून मोर्चातील मागण्या बाबत शासन लवकरच  धोरण ठरवेल असे आश्वासन दिले होते.
सांगली,सातारा,कोल्हापूर, सोलापूर या जिल्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी स्थापन केलेल्या शेड्युल कास्ट्स फेडरेशनच्या शाखा प्रत्येक तालुक्यातील गांवात होत्या.पश्चिम महाराष्ट्रात डॉ.आंबेडकरांच्या सभा, परिषदा, मेळाव्यास पी.टी. मधाळे हे उपस्थित असत. पी.टी. मधाळे यांनी सांगली जिल्ह्यात शेड्युल कास्ट्स फेडरेशन मजबूतपणे उभा केला होता. या भागात दलितावर अन्याय अत्याचार झाला तर ते वाघासारखे धावून जात असत.सांगली जिल्हयात त्यांनी शे.का. फेडरेशनची बांधणी मजबूतपणे केली होती. त्यावेळी डॉ. बाबासाहेबाना प्रमाण माणून  दलित-चळवळीत  सक्रियपणे व प्रामाणिकपणे तन-मन-धनाने काम करणारे कार्यकर्ते म्हणून १) रंगराव भिवा बनसोडे- बोरगांव वाळवा  २) पारिसा ज्योती गोंधळे-सांगली   ३)  अर्जुन तुकाराम कोलप-अंकली ,मिरज, ४) विष्णु परशुराम काकडे -गुरुजी- देशिंग मिरज ५) लालासाहेब ढेमाजी कांबळे ढवळी-मिरज  ६) धोंडीराम लाडाप्पा कांबळे-सांगली ७) धोंडीराम भिवा गोतपागर कुंडल ८) रामचंद्र आग्णु सावंत- कुंडल ९) आण्णा मोहन  मधाळे, मारुती घाडगे शिगांव -वाळवा   १०) शेकू मास्तर, कुंडलिकभंडारे-विटा,११) भाऊसाहेब दळवी-शिराळा१२) आनंदराव कांबळे-पलूस  १३) ज्ञानू खरात, सदाशिव मोटे आटपाडी अशा अनेक अनेक कार्यकर्त्यांची आंबेडकरी-दलित चळवळीची जिल्ह्यात मजबूत एक संघ पोलादी संघटना उभी राहिलेली  होती.
सन १९५०-५१ साली सांगली जिल्यातील आटपाडी या गांवातील पुर्वश्रमीच्या महार समाज्यास आटपाडी येथील डबई कुरणातील साडेचारशे एकर जमीन सरकारकडून मिळाली होती.परंतु सदर जमीनीवर जंगल असलेमुळे सरकारी आधिकारी जमिनीचा ताबा व कब्जा देणेस हरकत घेत  होते. सदर जमीनीत जाणेस मनाई करीत असलेमुळे आटपाडीच्या  महार समाज्याने जन आंदोलन उभे केले होते. त्यामुळे सन १९५२ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुणे मुक्कामी आले नंतर अँन्ड. शंकरराव खरात व पी. टी. मधाळे यांनी डॉ. आंबेडकरा समोर आटपाडीच्या महार- समाज्याच्या  जमिनीची कैफियत मांडली. त्यावेळी डॉ. आंबेडकरांनी जमिनीची  कागदपत्रे पाहून म्हणाले सांगली कलेक्टरांना अर्ज द्या, त्यामध्ये असे म्हणा की, शासनाने ही जमीन महार समाज्यास प्रदान केलेली आहे.त्यामुळे सदर जमिनीवरील सरकारची झाडे काढून घेवून जावा व जमीन मोकळी करून सदर जमिनीचा ताबा देणेत यावा, त्यानुसार मे.कलेक्टर यांना निवेदन दिले, त्यानंतर सदरची  जमीन समाज्यास आदेश काढून देणेत आलेली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील दलिताचे अग्रणी नेते मा. पी.टी. मधाळे दलित चळवळीत सक्रीय काम करीत असताना त्यांच्यावर जीव घेणे हल्ले करण्यात आलेले होते, त्यांना अनेक वेळा जीवे मारण्याच्या धमक्या सुद्धा देणेत आलेल्या होत्या. परंतु ते कधीही डगमगले नाहीत.दक्षिण सातारा लोकल बोर्डाच्या निवडणूकीमध्ये शेड्युल कास्टस फेडरेशन या पक्षाच्या वतीने निवडूण आले नंतर त्या निवडणूकीचा मनात राग धरून गांव गुंडांनी त्यांना जिवंत जाळणेचा प्रयत्न केला होता, कुपर गोडाऊन मध्ये  लोकल बोर्डाचे अध्यक्ष व उपाध्याक्षाची निवड सुरु असताना विरोधी गाव गुंडांनी त्यांच्या अंगावर रॉकेल टाकणेत आलेले होते. त्यामुळे वातावरण गंभीर झाले होते.  परन्तु मा. बाळासाहेब देसाई यांनी परीस्थितीचे गांभीर्य ओळखून गोडाऊनचे पाठीमागील दार तोडून पी. टी. मधाळे  यांना सुरक्षित बाहेर काढलेले होते. त्यानंतर पुन्हा बैठक घेऊन दक्षिण सातारा लोकल बोर्डचे अध्यक्ष म्हणून बाबासाहेब देसाई व पी. टी. मधाळे यांना उपाध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवडणेत आले होते. दुसरा प्रसंग असा आहे कि,
सन १९५७ साली खानापूर-आटपाडी या विधानसभेच्या (राखीव) जागेसाठी पी.टी.मधाळे हे शेड्युल कास्टस फेडरेशनच्या वतीने आमदार पदाची निवडणूक लढवित होते, त्या वेळी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा मोठा प्रभाव होता, त्यामुळे शेड्युल कास्ट्स फेडरेशन, संयुक्त महाराष्ट्र समिती, व शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार  म्हणून पी.टी.मधाळे हे निवडणूक लढवीत होते. पी.टी.मधाळे हे मतदार संघातून प्रचार करून जीप मधुन घरी जात असताना,गांव गुंडांनी जीप उभी करून जीपवर कडब्याच्या पेंढ्या रचून जीपला आग लावून त्यांना जीवंत जाळणेचा प्रयत्न सुरु केलेनंतर जीपचे ड्रायव्हर वाघमारे यांनी शिताफिने कडब्याच्या रचलेल्या आग लावलेल्या पेंढ्यातून जीप भरघाव पणे बाहेर काढली.परंतु गांव गुंड जीपच्या पाठीमागे पेटते पलीते घेवून पळत येत होते. काहीजण दगड मारत होते. प्रसंग बाका होता, त्यावेळी मधाळे हे घाबरून न जाता त्यांनी अंगावर घातलेल्या कोटाच्या खिशातून रुपयाचे बंडल काढून जीपमधूनच रस्त्यावर पैसे उधळण्यास सुरवात केलेनंतर रस्त्यावर पडलेले पैसे घेण्याच्या नादात गांवगुंडानी हातातील पेटते पलीते व दगड खाली टाकून रस्त्यातील पैसे गोळा करणेच्या नादात लागलेमुळे वाघमारे ड्रायव्हरने जीप सुसाट गांवच्या दिशेने घेवून येवून पी.टी.मधाळे यांचे प्राण वाचविले होते.त्यावेळी खानापूर- आटपाडी मतदार संघातील लोकांनी संयुक्त पक्षाच्या पी.टी.मधाळे यांना प्रचंड बहुमताने निवडून दिले होते.
सन १९५३ साली वारणा नदीस महापूर मोठ्या प्रमाणात आलेमुळे पुराच्या पाण्यामुळे शिंगांव येथील अनेक गोरगरीब लोकांच्या घराचे अतोनात नुकसान झालेमुळे त्यांच्यावर बेघर होनेची वेळ आली होती. त्यावेळी  पी.टी.मधाळे यांनी शासन स्तरावर अथक प्रयत्न करून  शासनाकडून वाढीव गांवठान साडे चार एकरांचे मंजूर करून घेऊन शिगांव हद्दी मध्ये पन्नास प्लॉट  पाडून पुराने बाधीत झालेल्या बेघर लोकाना शासनाकडून प्लॉट जागा देणेचे महत्त्वपूर्ण कार्य मधाळे आबांनी केलेले आहे. त्यामुळे शिगांव ग्रामपंचायतीने सदर वाढीव गांवठान जागेस पी. टी. मधाळे  नगर असे नामकरण केले आहे.
परमपुज्य डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचे निकटवर्तीय सहकारी आणि पश्चिम महाराष्ट्रातील अग्रणी नेते पी.टी.मधाळे यांच्या कार्य व कर्त्ववाचा गौरव करणेसाठी वारणा नदीवर बांधणेत आलेला शिगांव येथील आष्टा ते वडगांव रस्त्यावरील फुलास “आमदार पी.टी.मधाळे वारणानदी फुल” असे नामकरण करण्यात आले आहे. २) शिगांव येतील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक  मराठी शाळेस “पी.टी.मधाळे” यांचे नांव देणेत आलेले आहे.३) सांगली येथील सिव्हील हॉस्पीटल ते गारपीर (शंभर फुटी) रस्यास आमदार पी. टी.मधाळे  मार्ग असे नामकरण सांगली महापालिकेने केलेले आहे.
आमदार पी.टी.मधाळे यांच्या पतीचे नांव नवसाबाई (काकी)होते. त्यांनी घरचा प्रपंच व्यवस्थीत संभाळला होता. मधाळे यांना  अकरा मुले  व एक मुलगी असा परिवार होता.नवसाबाईचे(काकी) मुलांच्या शिक्षणाकडे बारकाईन लक्ष असे,मधाळे आबांना भेटणेसाठी अनेक लोक घरी येत असत, त्यांना चहा, पानी,नाष्टा,जेवन आपुकीने देत असत, घरच्या कामाचा कंटाळा करीत नसत. घरची जबाबदारी नवसाबाई (काकी)संभाळत असत, बाहेरच्या चळवळीची जबाबदारी पी.टी.मधाळे साहेब संभाळत असत. महामानव डॉ.बाबासाहेबाच्या विचाराचे गारुड पी.टी. मधाळे यांचेवर असलेमुळे गोरगरीब जनतेचा ते आवाज झाले होते. अशा या आंबेडकरी चळवळीच्या वाघाचे निर्वाण दिनांक १७ जानेवारी १९८८ रोजी शिगांव ता. वाळवा जि.सांगली  येथे झालेले आहे.
अशा या थोर आंबेडकरी शिलेदारास मानाचा जयभिम ।।

लेखन,
विलास खरात
मो.नं.९२८४०७३२७७
आटपाडी जि.सांगली


Back to top button
Don`t copy text!