डोंगरकपारीत वणवे रोखण्यासाठी उपाययोजना आवश्‍यक


स्थैर्य, फलटण, दि. ०३ (प्रसन्न रुद्रभटे) : डोंगरकपारीत उन्हाळ्यात वणवा लागण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. वणवे टाळण्यासाठी वन विभागाने डोंगर परिसरातील लोकांच्या जनजागृतीची मोहीम प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. वणवे रोखण्यासाठी स्थानिक पुढाऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. फलटण तालुक्‍याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात डोंगर परिसर आहेत. तालुक्‍याच्या हद्दीवर दुधेबाबी, गिरवी, ताथवडा, शिखर शिंगणापूर येथे डोंगर आहेत. अनेकवेळा या डोंगरांमध्येही आगी लागण्याचे प्रकार घडले आहेत. डोंगरकपारीतही आगी लागण्याच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे डोंगरकपारीतील वने नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

उन्हाळ्यात वणवा लागण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. या आगीत अनेक वनौषधी, सरपटणारे प्राणी, कीटक, तृणभक्षी प्राणी, त्यांची अंडी, घरटी जळून खाक होत असून, अंडी व घरटी जळाल्याने अनेक पक्षी त्या आगीत प्राणाची आहुती देतात. याबाबत जनजागृती चळवळ उभारण्याची गरज आहे. हे वणवे पावसाळ्यात गवत चांगले यावे, म्हणून लावले जातात. काही जण सहज जाताजाता विडी, सिगारेट पेटवून टाकतात. त्यामुळे आगी लागतात. काही जण केवळ हौस म्हणून आग लावतात, तर काही जण शेतातील पालापाचोळा जाळण्यासाठी आग लावतात. तीच आग आटोक्‍यात न आल्यास इतर ठिकाणी आगी लागतात. वनातील अथवा वनालगतच्या शेतातील झाडांवर असणारे मधमाश्‍यांचे पोळे काढण्यासाठीही आग लावली जाते. जर आपल्या आजूबाजूला असलेल्या कोणत्याही डोंगरमधील वणवा पेटलेला असेल किंवा आगीचा धूर दिसताच याबाबत जवळच्या वनाधिकाऱ्यांना अथवा कर्मचाऱ्यांना याची
माहिती देणे गरजेचे आहे.

हे करू नये

  1. डोंगरकपारीमध्ये स्वयंपाकासाठी अथवा शेकोटीसाठी विस्तव पेटवून तसाच जळत ठेवू नये. तसे करण्यापासून दुसऱ्यास परावृत्त करावे.
  2. डोंगरकपारीमध्ये बिडी, सिगारेट ओढून त्याची थोटके इतरत्र फेकू नये.
  3. डोंगरकपारीतिल अथवा वनालगतच्या शेतातील कचरा गोळा करून त्या झाडाखालील पालापाचोळा जाळू नये.
  4. रात्री डोंगरकपारीतून जाताना हातात टेभा, पलिता, धुंदरी घेऊन जाऊ नये. त्या ऐवजी बॅटरी घेऊन जावे.
  5. डोंगरकपारीलगतच्या शेताच्या बांधावरील काडी-कचरा निष्काळजीपणे जाळू नये.

आगीचा परिणाम असा होतो

  1. गवत, पालापाचोळा जळून राख झाल्याने जमिनीतील सेंद्रिय घटक नष्ट होतात.
  2. वनस्पती पुनर्निर्मितीला बाधा येते.
  3. चारा मिळेनासा होऊन जनावरे त्यासाठी भटकतात.
  4. ती अशक्‍त बनतात. दुभती जनावरे भाकड होतात.
  5. वनात पडलेली व वाळलेली झाडेझुडपे जळतात.
  6. वारंवार लागणाऱ्या आगींमुळे उघड्या पडलेल्या जमिनीवर पावसाचे पाणी थेट वेगाने पडते.
  7. जमिनीचा सुपीक मातीचा थर पाण्याच्या प्रवाहात वाहून जातो.
  8. जमिनीची धूप होऊन पाणी धारण करण्याची क्षमता नष्ट होते.
  9. भूगर्भातील पाण्याची पातळी खालावते. विहिरी, तळी वेळेपूर्वीच आटू लागतात.
  10. कीडभक्षी, पक्ष्यांची घरटी, अंडी, पिले जळून खाक होतात.
  11. विविध फळझाडे, बहुगुणी वनौषधी जळून खाक होतात.

आम्ही शासकीय वनक्षेत्रात नियमानुसार जाळरेषा काढलेल्या असतात. मात्र, काही लोक त्या शेजारील असलेल्या शेतात पाचट वैगरे पेटवत असतात त्या मुळे डोंगरांना आग लागण्याचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. डोंगराजवळील शेतकऱ्यांनी शेतातील केरकचरा पेटवत असताना दुसरीकडे आग पसरणार नाही, याची दक्षता घ्यावी. आग लावणारे सापडल्यास त्यांच्यावर नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल.
मारुती निकम, वनक्षेत्रपाल, फलटण.


Back to top button
Don`t copy text!