
थेट WhatsApp वर मिळवा
खासगी रुग्णालयांमध्ये वैद्यकीय उपकरणांच्या खरेदी आणि विक्री दरातील तब्बल २,८४१ टक्क्यांपर्यंतच्या तफावतीचा पर्दाफाश अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) केला आहे.
स्थैर्य, सातारा, दि. १६ सप्टेंबर : राज्यातील खासगी रुग्णालयांकडून सर्जिकल साहित्य आणि वैद्यकीय उपकरणांच्या नावाखाली रुग्णांची होणारी आर्थिक लूट रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) मोठा पुढाकार घेतला आहे. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यस्तरीय सर्वेक्षणाचा अहवाल सादर करत केंद्र सरकारकडे याप्रकरणी तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. रुग्णालये आणि उत्पादकांकडून होणारी नफेखोरी थांबवण्यासाठी उपकरणांवर मर्यादा (ट्रेड मार्जिन कॅप) निश्चित करण्याचे पत्र त्यांनी राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाला (एनपीपीए) पाठवले आहे.
२,८४१ टक्क्यांपर्यंतच्या नफेखोरीचा पर्दाफाश
एफडीएने केलेल्या विशेष सर्वेक्षणामध्ये खासगी रुग्णालयांकडून वापरल्या जाणाऱ्या सलाईन सेट, सिरिंज, कॅथेटर, ऑक्सिजन मास्क आणि नेब्युलायझरच्या किमतींचा सखोल अभ्यास करण्यात आला. अवघ्या ११.०५ रुपयांना खरेदी केलेला सलाईन आयव्ही इन्फ्युजन सेट रुग्णांच्या बिलावर तब्बल ३२५ रुपये एमआरपी लावून विकला जात असल्याचे निष्पन्न झाले. तसेच २९.४१ रुपयांचे कॅथेटर ३१० रुपयांना तर ४० रुपयांचे मास्क ७०० रुपयांपेक्षा जास्त किमतीत विकून २,८४१ टक्क्यांपर्यंत नफा कमवला जात असल्याचे समोर आले आहे.
रुग्ण हक्क आणि संरक्षणासाठी मोठे पाऊल
हा केवळ किमतींचा किंवा नफ्याचा विषय नसून थेट रुग्णांच्या हक्क आणि सुरक्षेशी संबंधित गंभीर बाब असल्याचे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना या उपकरणांच्या दरांची तुलना करण्याची संधी नसते. याचाच फायदा घेत रुग्णांची लूट केली जाते. त्यामुळे औषध किंमत नियंत्रण आदेशानुसार (डीपीसीओ) या वैद्यकीय साहित्याच्या किमतींवर थेट मर्यादा आणण्याची मागणी एफडीएने केली आहे.