शहीद यश देशमुख अनंतात विलीन:जवानाच्या कुटुंबियांना शासनाकडून 1 कोटी रुपयांची मदत


 

स्थैर्य, चाळीसगाव, दि.२८: चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील रहिवासी आणि मराठा रेजिमेंट जवान श्रीनगर येथे दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात 26 नोव्हेंबर रोजी शहीद झाले होते. त्यांच्यावर आज सकाळी 11.45 शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लहान भावाने मुखाग्नी देताच उपस्थितांना गहिवरून आले होते. यावेळी कृषी तथा सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी शहीद जवानाच्या कुटुंबियांना राज्य सरकार तर्फे एक कोटी रुपयांची मदत दिली जाईल, अशी घोषणा केली.

पिंपळगाव येथील यश दिगंबर देशमुख (वय 21) हे श्रीनगर येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये शहीद झाले होते. त्याचे पार्थिव शुक्रवारी रात्री नाशिक येथे विशेष विमानाने आणण्यात आले. त्यानंतर शनिवारी सकाळी 9 वाजता चाळीसगाव तालुक्यातील त्यांच्या मूळगावी पिंपळगाव येथे आणण्यात आले. सुरुवातीला यश देशमुख यांच्या घरी पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले. शहीद जवान यश देशमुख यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी घरी नेताच त्यांच्या आई, वडील, दोघी बहिणी व लहान भाऊ पंकज यांनी आक्रोश केला.

‘भारत माता की जय’च्या घोषणांनी आसमंत दणाणला –


सैन्य दलाच्या सजविलेल्या ट्रकमधून अंत्ययात्रा काढण्यात आली

देशमुख यांची अंत्ययात्रा राहत्या घरापासून अंत्यविधीच्या स्थळापर्यंत सैन्य दलाच्या सजविलेल्या ट्रकमधून नेण्यात आली. या अंत्ययात्रेत हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. अंत्ययात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात येत होती. शहीद जवान यश देशमुख अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम, पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणांनी आसमंत दणाणून उठला होता. यावेळी कृषी व सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन मानवंदना दिली.

परिवाराला महाराष्ट्र शासनातर्फे 1 कोटीची मदत

शहीद वीर जवान यश देशमुख यांच्या परिवाराला महाराष्ट्र शासनाकडून एक कोटी रुपयाची मदत देण्याची घोषणा कृषी व सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी केली. आहे. तसेच तरूणांना प्रेरणा मिळावी यासाठी सामुहिक प्रयत्नातून पिंपळगाव येथे यश देशमुख यांचे भव्य स्मारक उभारू असे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले.

शहीद यश देशमुख्य यांच्या अंत्ययात्रेत हजारोंच्या संख्येने सहभागी झालेला जनसमुदाय

शहीदा देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी स्थानिक लोकांनी 200 मीटर तिरंगा घेऊन गावातून रॅली काढली.

शहीद यश देशमुख यांचे पार्थिव अंत्यविधीच्या स्थळावर आणताना

शहीद देशमुख यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमलेला जनसमुदाय

शहीद देशमुख यांच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित मंत्री दादाजी भुसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि इतर मान्यवर मंडळी

शहीद यश देशमुख यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करताना मंत्री दादा भूसे

शहीद यश देशमुख यांना अखेरचा सलाम करताना सैन्य दलातील अधिकारी

हवेत बंदुकीच्या फैरी झाडून शहीद जवान यश देशमुख यांना अभिवादन करताना


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!