
थेट WhatsApp वर मिळवा
विद्यार्थ्यांसाठी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी भारतीय सैन्याकडून इंटर्नशिप कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, यामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना ७५ हजार रुपयांपर्यंत स्टायपेंड मिळणार आहे.
स्थैर्य, सातारा, दि. २५ ऑक्टोबर : देशाच्या सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो, याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी ‘इंडियन आर्मी इंटर्नशिप प्रोग्राम २०२६-२७’ (दुसरी आवृत्ती) जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत निवडक विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी, रोबोटिक्स, ड्रोन आणि डेटा ॲनालिसिस यांसारख्या आधुनिक क्षेत्रांमध्ये लष्कराच्या प्रत्यक्ष प्रोजेक्ट्सवर काम करण्याची संधी मिळणार आहे.
प्रोजेक्ट्स आणि कालावधीचे स्वरूप
या इंटर्नशिप प्रोग्राममध्ये तंत्रज्ञान, संशोधन आणि लॉजिस्टिक्सशी संबंधित सुमारे ४३ वेगळे प्रोजेक्ट्स समाविष्ट आहेत. यात मशीन लर्निंग, क्वांटम कॉम्प्युटिंग, 5G/6G तंत्रज्ञान आणि स्पेस टेक्नॉलॉजीचा समावेश आहे. ही इंटर्नशिप एकूण ७५ दिवसांची असून, यामध्ये ६० दिवस प्रत्यक्ष ऑफिस किंवा फील्ड ट्रेनिंग आणि १५ दिवस ‘वर्क फ्रॉम होम’चा समावेश असणार आहे.
स्टायपेंड आणि अर्ज प्रक्रिया
इंटर्नशिप यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यांना कमाल ७५ हजार रुपयांपर्यंत स्टायपेंड दिला जाणार आहे. तसेच AICTE मानकांनुसार १५ शैक्षणिक क्रेडिट्स आणि सैन्याकडून अधिकृत प्रमाणपत्र देखील मिळेल. इच्छुक विद्यार्थी AICTE च्या अधिकृत पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.





