मराठी भाषेचे संवर्धन केले पाहिजे – प्रोफेसर डॉ. प्रभाकर पवार


दैनिक स्थैर्य | दि. २० मार्च २०२४ | फलटण |
मराठी भाषेला जरी समृद्ध वारसा असला तरी तिच्यावर जागतिकीकरण व इतर गोष्टींचा अनिष्ठ परिणाम होत आहे. आधुनिक तंत्रज्ञान व लोकव्यवहार आणि लोकसंस्कृतीच्या माध्यमातून मराठी भाषेचा नव्याने विचार केल्यास मराठी भाषा जाज्ज्वल्य स्वरूपात लोकमानसात उतरून तिचे संवर्धन होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन मुधोजी महाविद्यालय फलटणचे पदवी व पदव्युत्तर मराठी विभागप्रमुख प्रोफेसर डॉ. प्रभाकर पवार यांनी केले.

श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल, जाधववाडी, फलटण यांनी आयोजित केलेल्या ‘मराठी राजभाषा दिन गौरव सोहळा’ व ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष फलटण एज्युकेशन सोसायटीचे सदस्य प्रा. चंद्रकांत पाटील होते. यावेळी प्रा. डॉ. सुधीर इंगळे, प्राचार्य डॉ. सागर निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

इंग्लिश व हिंदी किंवा इतर कुठल्याही भाषेचा द्वेष किंवा अनादर न करता मराठी मायबोली भाषेचा प्रत्येकाने आईच्या काळजाप्रमाणे विचार करावा. जगव्यवहार, देशव्यवहार, राज्यव्यवहार, त्या त्या भाषेत चालतात. त्याप्रमाणे मराठी भाषेलाही राज्य प्रशासन व्यवहारात दुर्लक्षिता कामा नये. मराठी भाषेचे ज्ञान वाढविण्यासाठी नुसत्या शाळा, महाविद्यालय नव्हे तर इतर सामाजिक, सांस्कृतिक मंच, प्रतिष्ठाने, समाजमाध्यमे यातून सहकार्य मिळाले पाहिजे. मराठी लोकजीवन, लोकव्यवहार, लोकसंस्कृती यामधून अनेक शब्द मिळतात. त्यांचे जतन केले पाहिजे व दैनंदिन जीवनात त्याचा वापर केला पाहिजे. या पद्धतीने मराठी भाषा संवर्धनाची जबाबदारी प्रत्येक व्यक्तीची असल्याचे डॉ. प्रभाकर पवार यांनी आवर्जून सांगितले.

यावेळी प्रा. डॉ. सुधीर इंगळे यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून समाजातील अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी चमत्कार व बुवाबाजी करणार्‍या भोंदू लोकांपुढे कुणीही बळी पडू नये. त्यांच्यापासून सावध राहून विज्ञानवादी व बुद्धीवादी जीवन जगावे, असा संदेश देताना विज्ञानवाद व तर्कबुद्धीचा विकास होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. अनुराधा रणवरे यांनी केले. यावेळी कवी कुसुमाग्रज व सी. व्ही. रामन यांच्या प्रतिमेचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पूजन झाले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय सौ.खराडे मॅडम व सौ. कुंभार मॅडम यांनी करून दिला. यानंतर प्राचार्या सौ. संध्या फाळके यांच्या हस्ते रोप देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी कु. सिद्धी, कु. सिद्धी निकम व कु. अनुष्का निंबाळकर या विद्यार्थिनींची राजभाषा दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन या विषयावर भाषणे झाली.

यावेळी कु. समर्था कांबळे, कु. समृद्धी कुंभार व कु. तनुष्का जगताप यांनी समूहगीत सादर केले. कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी -विद्यार्थिनी शिक्षक, शिक्षिका व पालक उपस्थित होते. प्रा. अविनाश पवार यांनी आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!