मुधोजी महाविद्यालयाच्या मराठी विभागाचा अनोखा उपक्रम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २० मार्च २०२४ | फलटण |
मुधोजी महाविद्यालयाच्या पदवी व पदव्युत्तर मराठी विभागाने ‘मराठी भाषा विशेष सप्ताह’ यानिमित्त क्षेत्रीय भेट अभ्यास सहल आयोजित केली होती. या अभ्यास सहलअंतर्गत ‘गंधवार्ता प्रेस’ व ‘दैनिक गंधवार्ता वृतपत्र’ या प्रकाशन संस्थेची निवड केली होती. या भेटीदरम्यान मराठी विषयाचे अध्ययन करणार्‍या ३५ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या प्रकाशन संस्थेमार्फत फलटण शहर, तालुका, सातारा जिल्हा, महाराष्ट्रात रोज जाणार्‍या गंधवार्ता वृतपत्र तसेच वार्षिक दिवाळी अंक, गंधवार्ता विशेष विशेषांक याविषयी माहिती घेतली.

‘दैनिक गंधवार्ता’ हे वृत्तपत्र गेली ४६ वर्षे अविश्रांत सुरू असून समाजात प्रबोधन, परिवर्तन व मार्गदर्शन करणारे ठरले आहे. यावेळी दैनिक गंधवार्ताचे सहसंपादक अ‍ॅड. रोहित अहिवळे यांनी प्रकाशन व्यवसायात येणार्‍या अनेक अडचणी सांगितल्या. संपादकीय लेखन, बातम्या, कागद, कामगार, वितरण, प्रवास, आर्थिक समस्या व लोकांच्या हातात वृतपत्र जाईपर्यंत कित्येक राबणारे हात याची कैफियत ऐकून सर्व विद्यार्थी अवाक झाले.

दै. गंधवार्ताने आजपर्यंत सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक व बौद्धिक समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रत्यक्ष व्यवसाय करत असताना चिकाटी, सातत्य व संयम याची गरज आहे. तसेच या व्यवसायाविषयी दै. गंधवार्ता प्रकाशन समूहाचे मालक व संपादक शामराव अहिवळे यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले.

सर्व माहिती फोटोसह घेतल्यानंतर सर्व अभ्यासक विद्यार्थी- विद्यार्थिनींना ऐतिहासिक भूमी डॉ. आंबेडकर स्मृती स्मारक शेरी, मंगळवार पेठ येथे अल्पोपहार देण्यात आला. या अभ्यास सहलीत मिळालेल्या अनोख्या माहितीमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रकाशन व्यवसायाबद्दल मिळालेल्या माहितीमुळे कुतूहल व समाधान दिसत होते. या सहलीचे संयोजन पदवी व पदव्युत्तर मराठी विभागप्रमुख प्रोफेसर डॉ. प्रभाकर पवार व सहसंयोजक प्रा. शैला क्षीरसागर यांनी केले होते.

शेवटी प्राचार्य, प्रोफेसर डॉ. पी. एच. कदम यांनी दैनिक गंधवार्ता प्रेसचे मालक शामराव अहिवळे यांचे आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!