
थेट WhatsApp वर मिळवा
मलठण येथील काळूबाईनगर नवरात्र उत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून महिलांसाठी खास होम मिनिस्टर स्पर्धा रंगणार आहे.
स्थैर्य, मलठण, दि. १२ ऑक्टोबर : काळूबाईनगर नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने यंदा नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवातील ‘होम मिनिस्टर: खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम महिलांसाठी विशेष आकर्षण ठरणार असल्याची माहिती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव जाधव यांनी दिली.
विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक उपक्रम
या महोत्सवाची सुरुवात ११ ऑक्टोबर रोजी घटस्थापनेने झाली आहे. उत्सवाच्या काळात मुलांसाठी खेळ, संगीत खुर्ची आणि प्रियांका भोसले यांचे शिवव्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. १५ ऑक्टोबर रोजी रेकॉर्ड डान्स स्पर्धा पार पडणार आहे. तसेच १७ ऑक्टोबरला संगीत खुर्ची, १८ ऑक्टोबरला चित्रकला, रांगोळी स्पर्धा व सायंकाळी भव्य दांडिया रंगणार आहे. १९ ऑक्टोबर रोजी बक्षीस वितरण तर २० ऑक्टोबरला देवीच्या पालखी सोहळ्याने महोत्सवाची सांगता होईल. दररोज सायंकाळी ८ वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
महिलांसाठी आकर्षक बक्षिसे
१६ ऑक्टोबर रोजी पार पडणाऱ्या ‘होम मिनिस्टर: खेळ पैठणीचा’ या स्पर्धेचे सूत्रसंचालन सानिका राजगुडे करणार आहेत. या स्पर्धेत विजेत्या महिलांना इलेक्ट्रिक शेगडी, मिक्सर, टेबल फॅन आणि ज्युसर यांसोबत पैठणी अशी भरघोस बक्षिसे दिली जाणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना नागरिकांनी व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





