
थेट WhatsApp वर मिळवा
सामाजिक बांधिलकी जपत फलटण येथील माळजाई मंदिरात स्व. श्रीराज संजय दुधाळ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भाविक व नागरिकांसाठी वॉटर कुलर बसवण्यात आला आहे.
स्थैर्य, फलटण, दि. १३ : फलटण येथील माळजाई मंदिरात येणाऱ्या भाविकांची आणि नागरिकांची पाण्याची सोय व्हावी, यासाठी बारामती येथील संजय दुधाळ यांनी मुलगा स्वर्गीय श्रीराज दुधाळ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ थंड पिण्याच्या पाण्याचा कुलर उपलब्ध करून दिला आहे. प्रमोद निंबाळकर व महेश गरवालिया यांच्या संकल्पनेतून तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष अतुल शहा यांच्या प्रयत्नातून ही सुविधा मंदिर परिसरात सुरू करण्यात आली आहे.
सामाजिक भावनेतून स्मृती जपण्याचा आदर्श
माळजाई मंदिर परिसरात दररोज शेकडो भाविकांसह अभ्यासासाठी येणारे विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांची मोठी वर्दळ असते. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांत पिण्याच्या पाण्याची होणारी अडचण लक्षात घेऊन हा उपक्रम राबवण्यात आला आहे. आपल्या मुलाच्या आठवणी केवळ मनात न ठेवता त्याला समाजोपयोगी कार्याची जोड देऊन दुधाळ कुटुंबाने एक संवेदनशील आदर्श समाजासमोर ठेवला आहे.
मान्यवरांची उपस्थिती
या उपक्रमाचे उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ, लायन्स क्लबचे अध्यक्ष रणजीत बर्गे, सेक्रेटरी प्रमोद निंबाळकर, खजिनदार दिलीपराव शिंदे, अर्जुनराव घाडगे, चंद्रकांत कदम, उद्योजक महेश गरवालिया, जगदीश पुरोहित, मनुभाई पटेल, बापूसाहेब जगताप, विजय पाटील, नीलम पाटील व सुहास निकम उपस्थित होते.





