
माळेगाव साखर कारखाना फलटण तालुक्यातील ऊस उत्पादकांना सभासदांप्रमाणेच दर देणार असल्याची घोषणा व्हाईस चेअरमन नितीन शेंडे यांनी केली.
स्थैर्य, निंबळक, दि. ०३ सप्टेंबर : फलटण तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांप्रमाणेच ऊस दर दिला जाईल, अशी ग्वाही माळेगाव कारखान्याचे व्हाईस चेअरमन नितीन शेंडे यांनी दिली. टाकळवाडे येथे आयोजित टाकळवाडे व निंबळक भागातील शेतकरी संवाद मेळाव्यात ते बोलत होते.
पारदर्शक कारभार आणि नियोजित सुरुवात
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचा कारभार पारदर्शकपणे सुरू आहे. ऊसाची कमतरता आणि दुष्काळाच्या संकटाचा विचार करून कारखाना नियोजित वेळेतच सुरू केला जाईल. कारखाना सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच फलटण तालुक्यात ऊस तोडणीची व्यवस्था केली जाणार असल्याचे शेंडे यांनी स्पष्ट केले.
वजन काट्याबाबतच्या अफवांवर स्पष्टीकरण
कारखान्याच्या वजन काट्याबाबत पसरवल्या जाणार्या अफवा पूर्णपणे चुकीच्या आहेत. शेतकर्यांनी खाजगी काट्यावर वजन करून आणल्यास अडचण वाटल्यास सर्व संचालक दक्ष राहतील. तसेच, ऊस तोडणीदार किंवा टोळीचालकांना पैसे देऊ नका, पहिला हप्ता इतर कारखान्यांपेक्षा जास्त दिला जाईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.