महाराज साहेब; वेळप्रसंगी हातात तुतारी घ्या! परंतु बाबांना खासदार करा


दैनिक स्थैर्य | दि. २२ मार्च २०२४ | फलटण | काल फलटणमध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या गटाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. यामध्ये राजे गटाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांसह विविध पदाधिकाऱ्यांनी आता येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटामध्ये जाऊन तुतारी हातात घ्यावी व आगामी काळात त्यानुसार कामकाज करावे; अशी आग्रही मागणी सर्वांनी सर्वांनी केली. यावर श्रीमंत रामराजे यांनी कार्यकर्त्यांची भावना पक्षश्रेष्ठींकडे कळवणार असल्याचे व्यक्त केले. यासोबतच महायुतीच्या आत्ताच्या उमेदवाराचे प्रचार करणे आम्हाला शक्य होणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी बोलताना विविध कार्यकर्त्यांनी “महाराज साहेब; काहीही करा; पण आमच्या बाबांना खासदार करा” अशी आग्रही भूमिका यावेळी व्यक्त केली.

यावेळी बोलताना श्रीमंत रामराजे म्हणाले की; प्रत्येक वेळी भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेऊन चालत नाही. आगामी काळामध्ये कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. याचा विचार करूनच निर्णय घेणे गरजेचे आहे. महायुतीने आत्ता जो उमेदवार जाहीर केला आहे; त्या उमेदवारासोबत आपण एका स्टेजवर जाऊ शकत नाही. माढा लोकसभेचे उमेदवार व त्यांचे सहकारी आमदार मित्र यांच्या हातामध्ये जिल्हा गेला तर जिल्ह्याची काय अवस्था होईल; याबाबत श्रीमंत रामराजे यांनी मत व्यक्त केले.

गत महिन्यांमध्ये श्रीमंत रामराजे यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता त्यामध्ये श्रीमंत रामराजे म्हणाले होते की काहीही झाले तरी विद्यमान खासदारांना पुन्हा तिकीट मिळू देणार नाही तरीसुद्धा भारतीय जनता पार्टीने पुन्हा विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्याने आगामी भूमिका जाणून घेण्यासाठी श्रीमंत रामराजे यांनी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते यामध्ये त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांसह महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची मते सुद्धा जाणून घेतली आहेत

त्यामुळे येणाऱ्या काळात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या भावना जपणार की अन्य काही निर्णय घेणार याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.


Back to top button
Don`t copy text!