फलटण तालुक्यातील प्रमुख ग्रामपंचायतींवर राजे गटाचेच वर्चस्व; खासदार गटाची कामगिरी समाधानकारक


कोळकीत सत्ता अबाधित; निंभोरेसह जावलीत सत्तांतर; साखरवाडीत पाटील गट ठणणार किंग मेकर

स्थैर्य, फलटण, दि.18 (प्रसन्न रुद्रभटे) : फलटण तालुक्यातील 80 ग्रामपंचायतींच्या निवडणूकीतील 6 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यानंतर उर्वरित 74 ग्रामपंचायतींच्या जाहीर झालेल्या निकालात प्रमुख ग्रामपंचायतींवर राजे गटाचेच वर्चस्व दिसून येत आहे. बहुचर्चित कोळकी ग्रामपंचायतीवर राजे गटाने सत्ता अबाधीत राखली असून निंभोरे व जावली ग्रामपंचायतीत सत्तांतर घडवण्यात राजे गटाला यश आले आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने म्हणजेच खासदार गटाने तालुक्यातील सुमारे १४ ग्रामपंचायतीवर आपली सत्ता स्थापन करत समाधान कारक कामगिरी केली आहे. साखरवाडीत मात्र विक्रम भोसले व राजे गटात अतिशय रंजक लढत झाली असून दोन्ही पॅनेलकडे स्पष्ट बहुमत नसल्याने ग्रामपंचायतीच्या सत्तेच्या चाव्या पाटील गटाकडे आल्या असल्याने आगामी काळात या ठिकाणी पाटील गट किंग मेकर ठरणार आहे.

कोळकीत सत्ता अबाधित मात्र बंडखोरांची सरशी; भाजपाची सपशेल धुलाई

कोळकीच्या निवडणूकीत माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्वत: लक्ष घातले होते. शिवाय त्यांचे अनेक दिग्गज कार्यकर्तेही या निवडणूकीत सक्रीय सहभागी झाले होते. मात्र असे असताना देखील भाजप पुरस्कृत श्रीराम पॅनेलच्या एकाही उमेदवाराचा विजय झाला नसून या ठिकाणी भाजपची सपशेल धुलाई झाली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत राजे गटाच्या उमेदवारांना जरी यश आले असले तरी अनेक ठिकाणी बंडखोर उमेदवार विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक ६ मध्ये राजे गटाने तुषार नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देवून स्वत: श्रीमंत संजीवराजे, श्रीमंत सत्यजीतराजे, श्रीमंत विश्‍वजीतराजे यांनी या ठिकाणी त्यांचा प्रचार केला होता. मात्र तरीही मतदारांनी त्यांना नाकारल्याने त्यांचा पराभव झाला आहे. याच प्रभागातील राजे गटाचे बंडखोर कार्यकर्ते बबलु निंबाळकर यांच्या मातोश्री सौ. लक्ष्मी रणजित निंबाळकर यांचा देखील विजय लक्षवेधी ठरला आहे.

जयकुमार शिंदे देणार पदाचा राजीनामा

दरम्यान, कोळकी ग्रामपंचायत निवडणूकीत भारतीय जनता पार्टीच्या झालेल्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारुन जयकुमार शिंदे हे आपला भारतीय जनता पाटीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याचे, त्यांनी स्वत: सोशल मिडीया प्लॅटफॉर्म WhatsApp वरील ग्रुप वर एका पोस्टद्वारे सांगीतले आहे.

साखरवाडीत पाटील गट ठरणार किंग मेंकर

महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विशेष लक्ष घातलेल्या साखरवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या निवडणूकीत विक्रम भोसले यांच्या पॅनेलने राजे गटाला जबरदस्त फाईट देत 17 पैकी 8 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे तर राजे गटाला 7 जागांवर समाधान मानावे लागले आहे. विशेष म्हणजे 2 जागांवर पाटील गटाचे उमेदवार निवडून आल्याने 17 सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीत या 2 उमेदवारांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार असून गावचा सरपंच आता ‘पाटील गट’च ठरवणार, असे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान, विक्रम भोसले हे स्वत: दोन प्रभागातून निवडून आले असल्याने त्यांना एका ठिकाणाहून राजीनामा द्यावा लागणार असून त्या ठिकाणी आगामी काळात पुन्हा निवडणूक होणार आहे. त्यामुळे ही निवडणूक पार पडेपर्यंत तुर्तास विक्रम भोसले 7 आणि राजे गट 7 असे बलाबल ग्रामपंचायतीत राहत असल्याने 2 उमेदवार विजयी झालेला पाटील गट किंगमेकरची भूमिका पार पाडणार आहे.

निंभोरेसह जावलीत सत्तांतर

फलटण तालुक्यातील निंभोरे ग्रामपंचायतीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या निवडणूकीत महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे स्वीय सहाय्यक मुंकद रणवरे विजयी झाले आहेत. तर माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे अत्यंत विश्‍वासू कार्यकर्ते अमित रणवरे हे पराभूत झाले आहेत. निंभोरे गावात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची स्वराज डेअरी कार्यरत असताना अमित रणवरे यांच्या रुपाने ग्रामपंचायतीवर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे वर्चस्व होते. मात्र स्वराज डेअरीच्या हस्तांतराचा फटका या निवडणूकीत अमित रणवरे यांना बसला असल्याची चर्चा निकालाअंती होत आहे.
तर दुसरीकडे फलटण तालुक्यातील जावली ग्रामपंचायतीत देखील राजे गटाला सत्तांतर घडवून आणण्यात यश आले आहे. या ठिकाणी सत्तांतर घडवण्यासाठी राजे गटाकडून याआधीही प्रयत्न झाले होते. तालुक्यातील कोणतीही निवडणूक असो, जावलीचे ग्रामदैवत असलेल्या श्री जावलसिद्धनाथाला श्रीफळ वाढवूनच राजे गटाकडून प्रचाराची सुरुवात केली जाते. त्यामुळे राजे गटाच्यादृष्टीने जावलीला विशेष महत्त्व असून यंदाच्या निवडणूकीत या ठिकाणी सत्ता मिळवण्यात राजे गटाला यश आले आहे.

जाधववाडीत राजे गटाअंतर्गत जमदाडे गटाचे वर्चस्व

फलटण शहरानजिक असलेल्या जाधववाडी ग्रामपंचायत निवडणूकीत राजे गटाअंतर्गत दोन पॅनेल एकमेकासमोर उभे राहिले होते. यामध्ये 13 पैकी 5 जागांवर जमदाडे गटाला यश मिळवता आले तर मुनीष जाधव यांच्या गटाचे 4 उमेदवार विजयी झाले. तर 2 अपक्ष उमेदवारांनी निवडणूकीत विजय मिळवला आहे.

निंबळकमध्ये राम निंबाळकर यांची सत्ता अबाधित

फलटण तालुक्यातील निंबळक ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या निवडणूकीत 13 पैकी 8 जागांवर प्रसिद्ध उद्योजक राम निंबाळकर यांच्या नेतृत्त्वाखालील उमेदवार विजयी झाल्यामुळे गत 15 वर्षापासूनची सत्ता अबाधित राखण्यात राम निंबाळकर यांना यश आले आहे.

राजाळेत सनदी अधिकारी विश्‍वासराव भोसले यांच्याकडे सत्ता

फलटण तालुक्यातील राजाळे ग्रामपंचायतीवर माजी सनदी अधिकारी विश्‍वासराव भोसले यांच्या नेतृत्त्वाखालील पॅनेलला सत्ता राखण्यात निर्विवाद यश प्राप्त झाले आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या कांचनमाला निंबाळकर यांच्या गटाचा दारुण पराभव झाला आहे. 13 जागांसाठी झालेल्या निवडणूकीत विश्‍वासराव भोसले यांच्या गटाचे 11 सदस्य तर कांचनमाला निंबाळकर यांच्या गटाचे 2 सदस्य विजयी झाले आहेत.

गुणवरेत ज्येष्ठ पत्रकार रमेश आढाव विजयी

फलटण तालुक्यातील गुणवरे ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत येथील ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव विजयी झाले आहेत. या विजयाबद्दल पत्रकारिता क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे विशेष अभिनंदन होत आहे.

बंडखोरांना पुन्हा राजे गटात प्रवेश की हकालपट्टी ?

यंदाच्या ग्रामपंचायत निवडणूकीत अनेक ठिकाणी राजे गटाच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली होती. या बंडखोरी विरोधात सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी अनेक ठिकाणच्या भाषणात तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मात्र; आता निकालानंतर निवडून आलेल्या बंडखोरांना पुन्हा राजे गटात प्रवेश दिला जाणार की त्यांची गटातून कायमस्वरुपी हकालपट्टी होणार? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.


Back to top button
Don`t copy text!