स्थैर्य, फलटण, दि. ११: फलटण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाविकास आघाडीतील सर्वात मोठा घटक पक्ष आहे. तालुक्यातील जनतेच्या अडीअडचणी, समस्या सोडवण्यात शिवसेना नेहमीच अग्रभागी राहिली आहे. सातत्याने जनतेच्या संपर्कात राहुन फलटण तालुक्याच्या समाजकारणात मोठा वाटा उचलणारा पक्ष म्हणून शिवसेनेकडे सध्या पाहिले जात आहे. शिवसेनेसह इतर मित्र पक्षांनाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी योग्य जागा व सन्मान देऊन महाविकास आघाडीत सामील करुन घ्यायला ते कदापि विसरणार नाहीत, अशी खात्री महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांना आहे. त्यामुळे महाविकास आघाडी फलटण तालुक्यात अबाधित राहील अशी अपेक्षा शिवसैनिकांनासह महाविकास आघाडीतील सर्वच मित्र पक्षातील पदाधीकार्यांना आहे, असे मत शिवसेना तालुका प्रमुख प्रदीप झणझणे यांनी व्यक्त केले.
‘स्थैर्य’ ने प्रकाशित केलेल्या ‘फलटण तालुक्याच्या राजकीय पटलावर महाविकास आघाडी टिकणार कां?’ या वृत्तावर प्रदीप झणझणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी 80% समाजकारण व फक्त 20% राजकारण करणार्या शिवसेना पक्षाचं नेतृत्व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यशस्वीपणे करत आहेत. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांसाठी जो आदेश देतील तो राज्यातील जनतेच्या हिताचाच असेल. पक्षप्रमुखांच्या व वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करुन फलटणकर जनतेच्या विकासाचा मार्ग अवलंबणे हे आम्हा शिवसैनिकांचं कर्तव्यच आहे, असेही शिवसेना तालुका प्रमुख प्रदीप झणझणे यांनी स्पष्ट केले.