
थेट WhatsApp वर मिळवा
महाराष्ट्रात समान नागरी संहिता लागू करण्याच्या दिशेने राज्य सरकारने पावले उचलली असून, यादरम्यान विवाह, घटस्फोट आणि लिव्ह-इन रिलेशनशिपबाबत ३७ महत्त्वाच्या मुद्द्यांवर जनतेकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत.
स्थैर्य,सातारा, दि. १९ ऑक्टोबर : राज्यात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्यासंदर्भातील मसुदा तयार करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने एक विशेष प्रश्नावली जाहीर केली आहे. यामध्ये विवाह, घटस्फोट, लिव्ह-इन रिलेशनशिप आणि संपत्तीचे अधिकार यांसारख्या संवेदनशील विषयांवर एकूण ३७ प्रश्न विचारण्यात आले असून, नागरिक व विविध संस्थांना १५ नोव्हेंबरपर्यंत आपले अभिप्राय सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लिव्ह-इन आणि कौटुंबिक कायद्यांवर विशेष भर
समितीने तयार केलेल्या या प्रश्नावलीमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांसाठी नोंदणी बंधनकारक असावी का, जोडीदाराने सोडल्यास पोटगी मिळायला हवी का आणि अशा नात्यांत जन्मलेल्या मुलांच्या हक्कांचे संरक्षण कसे व्हावे, याबाबत जनतेचे मत मागवण्यात आले आहे. तसेच विवाह योग्य वय, बहुविवाह बंदी, आणि वारसाहक्कामध्ये महिलांना समान हिस्सा मिळण्याबाबतही प्रश्न विचारण्यात आले आहेत.
जनतेच्या सहभागासाठी विशेष संकेतस्थळ
नागरिकांना आपली मते आणि सूचना सहज मांडता याव्यात यासाठी शासनाकडून एक स्वतंत्र संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. प्राप्त होणाऱ्या अभिप्रायांच्या आधारे समिती आपला अंतिम अहवाल तयार करणार असून, त्यानंतर आगामी विधिमंडळ अधिवेशनात यासंदर्भातील विधेयक मांडले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.





