
थेट WhatsApp वर मिळवा
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रलंबित आणि थकीत ई-चलनाचा दंड भरण्यासाठी वाहनधारकांना मोठा दिलासा देत राज्य सरकारने ‘महाराष्ट्र वाहतूक पोलिस चलान अभय योजना-२०२६’ राबवण्यास मंजुरी दिली आहे. या महत्त्वाच्या निर्णयामुळे वाहनधारकांना दंडाच्या रकमेवर २० टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे.
स्थैर्य, सातारा, दि. ०५ नोव्हेंबर : मोटार वाहन कायद्यानुसार वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांवर ई-चलनाद्वारे दंड आकारण्यात येतो. मात्र, मोठ्या प्रमाणावर दंड थकीत राहिल्याने आणि वसुली अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही विशेष अभय योजना आणण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेंतर्गत वाहनधारकांना थकीत दंड भरून आपली वाहने दंडमुक्त करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
तीन टप्प्यांत राबवली जाणार योजना
ही अभय योजना तीन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये लागू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात २१ जानेवारी २०२६ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत बजावलेल्या आणि वसुलीसाठी प्रलंबित असलेल्या तडजोडपात्र चलनावरील एकूण दंडावर २० टक्के सवलत दिली जाईल, ज्याचा कालावधी ३० दिवसांचा असेल. दुसऱ्या टप्प्यात १ नोव्हेंबर २०२६ पासून पुढील चलनावरील दंड ४५ दिवसांच्या आत भरल्यास ‘अर्ली बर्ड’ योजनेंतर्गत २० टक्के सवलत मिळेल आणि हा टप्पा एक वर्ष लागू राहील. तसेच तिसऱ्या टप्प्यात ३० जानेवारी २०१९ ते २० जानेवारी २०२६ या कालावधीत बजावलेल्या आणि न्यायालयात प्रलंबित असलेल्या चलानावरील थकीत दंडावरही ३० दिवसांच्या कालावधीसाठी २० टक्के सवलत देण्यात येणार आहे.





