
थेट WhatsApp वर मिळवा
स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीने कठोर कायद्याची शिफारस केली आहे. दोषींना १० कोटी रुपयांपर्यंत दंड आणि १० वर्षांपर्यंत कारावासाच्या शिक्षेचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
स्थैर्य,सातारा , दि. २४ नोव्हेंबर : राज्यातील स्पर्धा परीक्षा आणि नोकरभरती प्रक्रियेतील पेपरफुटीला कायमचा आळा घालण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. भरती प्रक्रियेतील सुधारणांसाठी नेमलेल्या उच्चस्तरीय समितीने आपला दुसरा अहवाल शासनाला सादर केला असून, त्यात पेपरफुटी करणाऱ्यांवर कठोर कारवाईची शिफारस केली आहे. या प्रस्तावित नियमांनुसार, संघटित गुन्हेगारीत सहभागी असणाऱ्यांना किमान १० कोटी रुपयांचा दंड आणि १० वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा देण्याची तरतूद सुचवण्यात आली आहे.
गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कायद्याचा बडगा
समितीच्या अहवालात परीक्षांमधील संघटित गैरप्रकार रोखण्यासाठी अत्यंत कडक शिक्षेची तरतूद सुचवण्यात आली आहे. संघटित गुन्हेगारीत सहभागी व्यक्ती आणि संस्थांना ७ ते १० वर्षांचा कारावास, किमान १० कोटी रुपये दंड तसेच त्यांची मालमत्ता जप्त करण्याची शिफारस करण्यात आली आहे. परीक्षेत अनुचित साधनांचा वापर करणाऱ्यांना ५ ते १० वर्षे कारावास आणि ५० लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जावा, असे सुचवले आहे. याशिवाय, गैरप्रकारात सहभागी सेवा पुरवठादार संस्थांना ५ कोटी रुपयांपर्यंत दंड आणि ८ वर्षांसाठी काळ्या यादीत टाकून बंदी घालण्याची शिफारस करण्यात आली आहे.
तपासासाठी विशेष कृती दल आणि स्वतंत्र न्यायालये
परीक्षा गैरप्रकारांचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत करण्यात यावा आणि गंभीर प्रकरणांच्या तपासासाठी विशेष कृती दल (STF) स्थापन करावे, अशी सूचना अहवालात केली आहे. तसेच, हे खटले जलदगतीने निकाली काढण्यासाठी विशेष न्यायालये स्थापन करण्याची शिफारसही करण्यात आली आहे. परीक्षांवर देखरेख ठेवण्यासाठी त्रिस्तरीय ‘कमांड अँड कंट्रोल सेंटर’ आणि सायबर सुरक्षेसाठी स्वतंत्र तंत्रज्ञान कक्ष उभारण्याचा प्रस्तावही समितीने मांडला आहे.
एमपीएससी उमेदवारांसाठी दिलासादायक शिफारशी
उच्चस्तरीय समितीने विद्यार्थ्यांच्या हिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय सुचवले आहेत. परीक्षा दिल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण परीक्षा शुल्क परत करण्याची आणि उत्तरतालिकेवरील हरकत योग्य ठरल्यास त्याचे शुल्कही परत देण्याची शिफारस करण्यात आली आहे. दरवर्षी ऑक्टोबरपर्यंत पुढील वर्षाचे वार्षिक परीक्षा वेळापत्रक जाहीर करणे, आधार किंवा ‘महाआयडी’द्वारे एकदाच नोंदणी सुविधा देणे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली स्वतंत्र परीक्षा शाखा व परीक्षा केंद्रांची बँक तयार करण्याचेही अहवालात सुचवण्यात आले आहे.



