
थेट WhatsApp वर मिळवा
राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील सहावी ते आठवीच्या सर्व पात्र विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्या याचिका फेटाळून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय कायम ठेवला आहे.
स्थैर्य,सातारा, दि. २४ नोव्हेंबर : राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये सहावी ते आठवीच्या वर्गांना शिकविणाऱ्या पात्र विषय शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पदवीधर वेतनश्रेणीचा लाभ केवळ एकतृतीयांश शिक्षकांनाच मर्यादित ठेवण्याचा राज्य सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला आहे. महाराष्ट्र सरकारने दाखल केलेल्या विशेष अनुमती याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे सर्व पात्र विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात कायम
चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यांतील शिक्षकांनी २०१६ च्या शासन निर्णयातील एकतृतीयांश मर्यादेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले होते. यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मुकुलिका जवळकर आणि न्यायमूर्ती नंदेश देशपांडे यांच्या खंडपीठाने ८ मे रोजी सर्व पात्र शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी देण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह आणि न्यायमूर्ती सुनीता अग्रवाल यांच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे स्पष्ट करत सरकारच्या याचिका फेटाळल्या.
थकबाकीसह वेतनश्रेणीचा लाभ मिळणार
समान शैक्षणिक पात्रता आणि समान काम करणाऱ्या सर्व पात्र विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. नियुक्तीच्या तारखेपासून किंवा आवश्यक शैक्षणिक पात्रता प्राप्त केल्याच्या तारखेपासून ही वेतनश्रेणी लागू करून वेतनातील फरकाची थकबाकी अदा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. या प्रकरणात याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. प्रदीप क्षीरसागर यांनी बाजू मांडली. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो जिल्हा परिषद विषय शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, सरकार या निर्णयाची अंमलबजावणी कधी करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



