८ कोटी नोकरदारांसाठी मोठी खुशखबर; आता UPI द्वारे अवघ्या काही मिनिटांत काढता येणार PF ची रक्कम!

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून (EPFO) वर्षाअखेर ८ कोटींहून अधिक सदस्यांना मोठी भेट मिळणार असून, डिसेंबरअखेरपर्यंत थेट UPI द्वारे पीएफची रक्कम काढण्याची सुविधा सुरू होण्याची शक्यता आहे.

स्थैर्य, सातारा, दि. २४ नोव्हेंबर : देशातील ८ कोटींहून अधिक नोकरदारांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) लवकरच ‘UPI’ द्वारे थेट पीएफची (PF) रक्कम काढण्याची विशेष सुविधा सुरू करणार आहे. ‘EPFO 3.0’ या डिजिटल सुधारणा मोहिमेचा हा महत्त्वाचा भाग असून, तांत्रिक चाचण्या पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर २०२६ च्या अखेरीस ही सेवा कार्यान्वित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना गरजेच्या वेळी पीएफचे पैसे मिळविण्यासाठी आठवडाभर वाट पाहण्याची गरज भासणार नाही.

नवीन प्रणाली नेमकी कशी काम करणार?

आतापर्यंत पीएफची रक्कम काढण्यासाठी ईपीएफओ पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा लागत होता आणि पैसे खात्यात जमा होण्यास ७ ते १५ दिवसांचा कालावधी लागत असे. नवीन प्रणालीनुसार, ही सुविधा कर्मचाऱ्याच्या युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) आणि बँक खात्याशी जोडलेल्या यूपीआय आयडीशी संलग्न असेल. सुरुवातीला ही सेवा ‘भीम’ (BHIM) ॲपवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. या माध्यमातून सदस्यांना आपल्या खात्यातील एकूण शिल्लक, किमान ठेवावी लागणारी रक्कम आणि काढण्यासाठी पात्र असलेली रक्कम याची माहिती तात्काळ पाहता येईल.

९० टक्क्यांपर्यंत रक्कम काढण्याची मुभा आणि नवे नियम

१९ नोव्हेंबर रोजी झालेल्या ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या (CBT) बैठकीत पीएफ काढण्याच्या नियमांत मोठे बदल करण्यात आले आहेत. या निर्णयानुसार, खात्यातील किमान शिल्लक मर्यादा कमी करून सदस्यांना त्यांच्या पात्र शिलकीच्या ९० टक्क्यांपर्यंत आंशिक रक्कम काढण्याची मुभा मिळणार आहे. तसेच, पीएफ काढण्याचे जुने १३ क्लिष्ट नियम रद्द करून ते आता तीन सोप्या श्रेणींमध्ये विभागले गेले आहेत. यामध्ये विवाह, शिक्षण व आजारपण यांसारख्या अत्यावश्यक गरजा, घर खरेदी किंवा गृहकर्ज परतफेड आणि नोकरी जाणे किंवा नैसर्गिक आपत्ती या श्रेणींचा समावेश आहे.

CITES 2.01 प्रणालीचा वापर

ईपीएफओने आपला डिजिटल प्लॅटफॉर्म अधिक वेगवान आणि आधुनिक करण्यासाठी ‘CITES 2.01’ (Centralised IT Enabled Services) ही नवीन प्रणाली कार्यान्वित केली आहे. ‘UPI विड्रॉल मॉड्यूल’ सक्रिय झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना ईपीएफओ पोर्टलवर जाऊन आपल्या बँक खात्याशी संलग्न असलेला यूपीआय आयडी सक्रिय करावा लागेल. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्याचा UAN क्रमांक सक्रिय असणे आणि केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण असणे अनिवार्य राहणार आहे.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!