शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान कधी मिळणार? डिसेंबरमध्ये पैसे जमा होण्याची शक्यता

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

नियमित पीककर्जाची परतफेड करणाऱ्या राज्यातील पात्र शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. डिसेंबरमध्ये ही रक्कम खात्यावर जमा होण्याची शक्यता असून, पडताळणी प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी जोर धरत आहे.

स्थैर्य, सातारा, दि. २४ नोव्हेंबर : राज्यातील नियमित पीककर्जाची परतफेड करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या ५० हजार रुपयांच्या प्रोत्साहनपर अनुदानाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असतानाच, नियमित कर्जदारांच्या खात्यात हे प्रोत्साहनपर अनुदान डिसेंबर महिन्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे वाढत्या शेती खर्चाच्या पार्श्वभूमीवर या आर्थिक मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

कोणत्या शेतकऱ्यांना किती अनुदान मिळणार?

शासनाच्या नियमांनुसार, नियमितपणे पीककर्जाची परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना कमाल ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी ५० हजार रुपये किंवा त्याहून अधिक पीककर्ज घेऊन त्याची वेळेवर परतफेड केली आहे, त्यांना पूर्ण ५० हजार रुपयांचा लाभ मिळेल. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी ५० हजार रुपयांपेक्षा कमी पीककर्ज उचलले आहे, त्यांना प्रत्यक्ष कर्ज रकमेइतकेच अनुदान मिळणार असल्याचे सहकार विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, थकीत कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना या प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळणार नाही.

पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून तात्काळ वितरणाची मागणी

खते, बियाणे, मजुरी आणि ट्रॅक्टर भाड्याचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. त्यातच हमीभावाचा अभाव आणि नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. अशा कठीण परिस्थितीतही बँकेची पत टिकवण्यासाठी शेतकरी उसनवारी करून नियमित कर्जफेड करत आहेत. पुढील हंगामाच्या तयारीसाठी या ५० हजार रुपयांच्या अनुदानाचा मोठा आधार मिळणार आहे. त्यामुळे प्रशासनाने तांत्रिक त्रुटी दूर करून पात्र शेतकऱ्यांची पडताळणी तात्काळ पूर्ण करावी आणि अनुदान वितरणाची अधिकृत तारीख जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!