
थेट WhatsApp वर मिळवा
मान्सूनने निम्म्या राज्यातून माघार घेतल्यामुळे परतीच्या पावसाची आशा मावळली असून खरीप पिकांच्या नुकसानीनंतर आता रब्बीच्या पेरण्यांवरही टांगती तलवार निर्माण झाली आहे.
स्थैर्य,सातारा, दि. ०४ ऑक्टोबर : राज्यात यंदा मान्सूनच्या काळात सरासरीच्या १९ टक्के कमी पाऊस झाला असतानाच, आता मुंबई आणि पुण्यासह निम्म्या महाराष्ट्रातून मोसमी पावसाने माघार घेतली आहे. हवामान विभागाने मान्सूनच्या परतीचा प्रवास वेगाने सुरू असल्याचे स्पष्ट केल्याने परतीच्या पावसावर अवलंबून असलेला रब्बी हंगाम मोठ्या संकटात सापडला आहे. ऐन गर्भाच्या टप्प्यात पावसाने दिलेल्या ओढीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन, मूग आणि उडीद ही पिके आधीच हातातून गेली आहेत. आता परतीचा पाऊसही हुकल्यामुळे उर्वरित कापूस आणि तुरीच्या उत्पादनाला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जलसाठ्यात मोठी तूट; रब्बीच्या पेरण्या घटणार
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्यात तुर्तास कोणत्याही वादळी पावसाची शक्यता नाही. राज्यात सरासरी ९०४.५ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असताना यंदा केवळ ८०४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अनेक भागांत सिंचनासाठी पुरेसा जलसाठा उपलब्ध नसल्याने शेतकरी रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा आणि गव्हाच्या पेरण्या लांबवण्याच्या किंवा टाळण्याच्या मनस्थितीत आहेत. त्यामुळे राज्यात रब्बीच्या एकूण लागवड क्षेत्रात मोठी घसरण होण्याची भीती कृषी विभागाकडून व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांसमोर दुहेरी आर्थिक संकट
पावसाच्या अभावामुळे जमिनीतील ओलावा वेगाने कमी होत असून भूजल पातळी घटल्याने विहिरी आणि कूपनलिकांच्या पाण्याचा उपसाही मंदावला आहे. खरिपाचे भांडवल वाया गेल्यानंतर रब्बी हंगामाकडून असलेल्या उरल्यासुरल्या आशाही धुळीस मिळाल्याने ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. ऐन सणासुदीच्या काळात शेतीतील उत्पादन घटल्याने आणि चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने राज्य सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी तीव्र मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.





