
थेट WhatsApp वर मिळवा
महाराष्ट्रातून मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असून हवामान कोरडे झाल्याने राज्यात ऑक्टोबर हीटचा प्रभाव आणि तापमान वाढण्याची शक्यता आहे.
स्थैर्य, सातारा, दि. ०९ ऑक्टोबर : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी महाराष्ट्राच्या उर्वरित भागातूनही पूर्णपणे माघार घेतली असून संपूर्ण राज्यातून मान्सूनचा प्रवास पूर्ण झाला आहे. मान्सूनच्या माघारीनंतर राज्यातील हवामान कोरडे झाले आहे. यंदा पावसाचा हंगाम संपताना राज्यात सरासरीच्या तुलनेत १९ टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली असून, सप्टेंबर महिन्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने पाणीटंचाईची चिंता वाढली आहे.
राज्यात पावसाची १९ टक्के तूट
यंदाच्या पावसाळ्यात राज्यातील अनेक भागांत अपेक्षेइतका पाऊस झाला नाही. विशेषतः सप्टेंबर महिन्यात पावसाची तब्बल ५२ टक्के तूट नोंदवण्यात आली. विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांना पावसाच्या कमतरतेचा मोठा फटका बसला असून, काही भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. ऑगस्ट महिन्यापासून पावसाने घेतलेली दडी आणि पावसाचे असमान वितरण यामुळे खरीप पिकांच्या उत्पादनावरही प्रतिकूल परिणाम झाला आहे.
ऑक्टोबर महिन्यात उकाडा वाढण्याचा अंदाज
मान्सूनच्या माघारीनंतर आकाश निरभ्र झाल्यामुळे राज्यातील बहुतांश भागांत कमाल तापमानात तीन ते चार अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. त्यामुळे ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागत आहे. कोकणासह राज्यातील विविध भागांत आगामी दिवसांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, उत्तर-पश्चिम भारतात पश्चिमी विक्षोभाच्या प्रभावामुळे हिमालयीन प्रदेशात पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज आहे.



