
थेट WhatsApp वर मिळवा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) होणाऱ्या वैद्यकीय शिक्षण संचालनालयाच्या परिचारिका भरतीतील ८०:२० महिला-पुरुष आरक्षण धोरणाविरोधात विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. ही तरतूद रद्द करून समान संधी देण्याची मागणी होत आहे.
स्थैर्य, सातारा, दि. २४ नोव्हेंबर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या (DMER) परिचारिका (स्टाफ नर्स) भरती प्रक्रियेतील ८०:२० महिला-पुरुष आरक्षण धोरणाविरोधात राज्यातील नर्सिंग विद्यार्थी आणि पुरुष परिचारिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. एकूण ३ हजार ९११ पदांच्या या भरतीमध्ये ८० टक्के जागा महिलांसाठी आणि केवळ २० टक्के जागा पुरुषांसाठी राखीव ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले आहे. या भरतीमध्ये लिंगभेद न करता गुणवत्तेनुसार सर्वांना समान संधी मिळावी, अशी आग्रही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
२८८ आमदारांना निवेदन देत धोरण रद्द करण्याची मागणी
पूर्वी शासकीय रुग्णालयांमधील परिचारिका भरतीत महिलांसाठी ३० टक्के आरक्षण होते आणि उर्वरित ७० टक्के जागांवर महिला व पुरुष दोघांनाही गुणवत्तेनुसार संधी मिळत होती. मात्र, नव्या नियमावलीनुसार ३ हजार ९११ पदांपैकी ३ हजार १३० जागा महिलांसाठी, तर पुरुषांसाठी केवळ ७८१ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. हा पुरुष उमेदवारांवर अन्याय असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी राज्यातील सर्व २८८ आमदारांना लेखी निवेदने देऊन ही ८०:२० ची तरतूद तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे.
सरकारने दुर्लक्ष केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
गेल्या वर्षभरापासून मंत्रालयात या विषयावर सातत्याने पाठपुरावा करूनही आणि विविध नेत्यांनी आश्वासने देऊनही अद्याप ठोस निर्णय झालेला नाही, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. मुख्यमंत्री चर्चेसाठी वेळ देत नसल्याची खंतही आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे. राज्य सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आगामी काळात राज्यव्यापी आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा नर्सिंग विद्यार्थ्यांनी दिला आहे.



