शासन निर्णय व योजनांच्या लाभात मातंग समाज पिछाडीवर; अभ्यास समितीच्या अहवालातील आकडेवारीने वेधले लक्ष

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या आरक्षण वर्गीकरण अभ्यास समितीच्या अहवालातून अनुसूचित जातींमधील योजनांच्या लाभाची आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये मातंग समाज पिछाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

स्थैर्य, सातारा, दि. २५ नोव्हेंबर : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध २३ योजनांच्या लाभांमध्ये अनुसूचित जातींमधील दुसऱ्या क्रमांकाचा जातसमूह असलेल्या मातंग समाजाची मोठी पिछेहाट झाली असल्याचे समोर आले आहे. आरक्षण वर्गीकरण अभ्यास समितीच्या अहवालातील आकडेवारीनुसार, राज्यात मातंग समाजाची लोकसंख्या १८ टक्के असूनही या समाजाला केवळ १३ टक्के योजनांचा लाभ मिळाला आहे. दुसरीकडे, ६० टक्के लोकसंख्या असलेल्या बौद्ध समाजाला ६६ टक्के, तर ०.८८ टक्के लोकसंख्या असलेल्या ढोर समाजाला १.४२ टक्के योजनांचा लाभ मिळाला आहे.

अभ्यास समितीच्या अहवालातील नेमकी आकडेवारी

न्यायमूर्ती बदर समितीने अनुसूचित जातींच्या १३ टक्के आरक्षणाचे ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण करण्यासंदर्भात राज्य शासनाला शिफारशी सुपूर्त केल्या आहेत. या समितीला सांख्यिकी माहिती देण्यासाठी नेमलेल्या ९ सदस्यांच्या अभ्यास समितीने २०२१ ते २०२३ या काळातील ५९ अनुसूचित जातींच्या योजना लाभाचे विश्लेषण केले आहे. यामध्ये १० टक्के लोकसंख्या असलेल्या चर्मकार समाजाला १० टक्के लाभ मिळाला असून, १.६४ टक्के लोकसंख्येच्या भंगी समाजाला ०.९३ टक्के आणि उर्वरित ५४ जातींना अवघा ३ टक्के लाभ मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिष्यवृत्ती आणि वसतिगृह योजनांमधील चित्र

परदेशात शिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीच्या ६७ जागांपैकी ६० जागा बौद्ध समाजातील विद्यार्थ्यांनी पटकावल्या आहेत, तर उच्च शिक्षण शिष्यवृत्तीत ३४ पैकी २५ लाभार्थी बौद्ध आहेत. मिनी ट्रॅक्टर योजनेत १२२ पैकी १०५ लाभार्थी बौद्ध, ११ चर्मकार आणि केवळ ५ लाभार्थी मातंग समाजातील आहेत. तसेच, राज्यातील अनुदानित शासकीय वसतिगृहांमध्ये ६४ टक्के बौद्ध, २६ टक्के मातंग, ५ टक्के चर्मकार आणि ३ टक्के ढोर समाजाचे विद्यार्थी प्रवेशित आहेत.

अहवालावरून राजकीय नेत्यांमध्ये मतमतांतरे

या अहवालातील आकडेवारीवरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. “आरक्षण वर्गीकरण अभ्यास समितीत एकाच जातीचे प्रतिनिधी होते. मातंग समाज उपेक्षित असल्याचे चित्र उभे करणारा हा अहवाल पूर्वग्रहदूषित आहे,” अशी टीका माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केली आहे. तर, “हा अहवाल तत्कालीन समाजकल्याण आयुक्तांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांनी गोळा केलेल्या शासकीय आकडेवारीवर आधारित आहे. अतिवंचित घटकांची झालेली पिछेहाट पुढारलेल्या जातींनी स्वीकारली पाहिजे,” अशी प्रतिक्रिया भाजपचे विधानपरिषद आमदार अमित गोरखे यांनी दिली आहे.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!