
थेट WhatsApp वर मिळवा
१,१०० कोटी रुपयांची थकबाकी न मिळाल्यामुळे ‘एचएलएल लाईफ केअर लिमिटेड’ कंपनीने महाराष्ट्रातील सर्व महालॅब, मोफत डायलिसिस केंद्रे आणि ‘आपला दवाखाना’ सेवा बंद केल्या आहेत.
स्थैर्य, सातारा, दि. ०३ नोव्हेंबर : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या आरोग्य सेवांवर मोठा संकट ओढवले आहे. राज्य शासनाकडून जवळपास १,१०० कोटी रुपयांची देणी थकल्यामुळे ‘एचएलएल लाईफ केअर लिमिटेड’ या कंपनीने १ नोव्हेंबरपासून राज्यातील सर्व महालॅब, मोफत डायलिसिस केंद्रे आणि ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ या सेवा पूर्णपणे बंद केल्या आहेत. यामुळे राज्यभरातील सर्वसामान्य रुग्णांना मोफत आरोग्य सेवेपासून वंचित राहावे लागत आहे.
विनाअनुदानित सेवा आणि कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले
आरोग्य विभागातर्फे ‘एचएलएल लाईफ केअर लिमिटेड’ सोबत १० वर्षांचा करार करण्यात आला होता. याद्वारे मागील ७ वर्षांपासून सुमारे ४०० महालॅब, २२५ आपला दवाखाने आणि ११० डायलिसिस केंद्रे चालवली जात होती. याद्वारे ग्रामीण भागातील नागरिकांना सीबीसी, थायरॉईड आणि बायोकेमिस्ट्रीसारख्या मोफत चाचण्या मिळत होत्या. मात्र, मागील दोन वर्षांपासून शासनाकडून निधी न मिळाल्यामुळे १ हजार ६७ कोटी रुपयांची थकबाकी निर्माण झाली आहे. परिणामी, ४ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले असून वैद्यकीय साहित्य व किट्स खरेदी करणे अशक्य झाल्याने कंपनीला हा कठोर निर्णय घ्यावा लागला आहे.





